अभिनयासाठी दाद मिळण्यापूर्वीच सम्यकची एक्‍झिट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

नागपूर - फार तर दहा दिवस झाले असतील... सकाळी दहाच्या सुमारास लक्ष्मीनगरच्या सायंटिफिक सभागृहात बालनाट्य स्पर्धेत ‘बाल भगत’चा प्रयोग सुरू होता... सम्यक गजभिये नावाचा बारा वर्षांचा कलावंत उत्तम अभिनय साकारत होता... नाटक संपले, सम्यकचे कौतुकही झाले... आज (सोमवार) सायंकाळी स्पर्धेचा निकाल लागला... सम्यकला अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र जाहीर झाले... दुर्दैवाने ही दाद मिळण्याच्या काही तासांपूर्वी सम्यकने आयुष्याच्या रंगभूमीवरून खरीखुरी एक्‍झिट घेतली होती. चटका लावून जाणाऱ्या या घटनेने रंगभूमी हळहळतेय.

शताब्दी चौकाजवळील रमानगर येथे राहणारा सम्यक अनिल गजभिये गेल्या चार वर्षांपासून बालरंगभूमीवर काम करतोय. यावर्षी संजय जीवने लिखित व लुंबिनी आवळे दिग्दर्शित ‘बाल भगत’ नाटकात त्याची भूमिका होती. सांची जीवने हिच्या तालमीत तो तयार होत होता. बौद्ध रंगभूमीसाठी काम करणारा सम्यक नाटकासाठी बारा-बारा तास तालीम करीत होता. दहा दिवसांनी आपल्याला त्याचे फळ मिळणार आहे, याची कल्पनाही त्याला नसावी. दोन दिवसांपूर्वी सम्यकला ताप आला. ताप कमी होत नसल्याने त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले; पण ताप मेंदूत गेल्याने आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून सारेच निकालाची प्रतीक्षा करीत होते.

आज सकाळी निकालाची बातमी कळण्यापूर्वी सम्यकच्या निधनाचे वृत्त ऐकताच सर्वांचे कान सुन्न झाले. आपण नाटकातील एखादा प्रसंग बघतोय की काय, असेच काही क्षण सर्वांना वाटले. दुर्दैवाने सम्यकने खरीखुरी एक्‍झिट घेतली होती. बिपीन कृष्णा बोस या शाळेत तो सातव्या वर्गात शिकत होता. अभ्यास, क्रीडा, नृत्य, अभिनय या सर्व क्षेत्रांमध्ये तो अव्वल होता. वडील एका कंपनीत काम करतात. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. आज दुपारी मानेवाडा घाटावर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असताना ‘हा एखाद्या नाटकाचा प्रसंग असता तर बरे झाले असते’ या विचाराने सारे हळहळले होते. 

‘ढॅंटढॅन’, ‘बाल रमाई’ अन्‌ ‘बाल भगत’ !
सम्यकचे बालनाट्य स्पर्धेतील हे तिसरे नाटक होते. ‘ढॅंटढॅन’, ‘बाल रमाई’ आणि यंदा ‘बाल भगत’ अशा तीन नाटकांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. याव्यतिरिक्त ‘रमाई’, ‘डोंबारी’, ‘भट्टी’ आदी नाटकांमध्ये त्याने काम केले आहे. यावर्षी प्रथमच गुणवत्ता प्रमाणपत्राच्या निमित्ताने त्याला दाद मिळाली होती. संजय जीवने, वंदना जीवने व सांची जीवने यांच्याच मार्गदर्शनात त्याने बालरंगभूमीवर प्रवेश घेतला. सम्यकच्या निधनामुळे एक उत्तम उदयोन्मुख नट गमावल्याची भावना ते व्यक्त करीत आहेत.

Web Title: nagpur news samyak gajbhiye death