शाळा आजपासून गजबजणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

नागपूर - जवळपास दीड महिन्याच्या सुटीनंतर विदर्भातील शाळा मंगळवारपासून सुरू होणार आहेत. नवीन वह्या-पुस्तके, नवे दप्तर यांसह शैक्षणिक साहित्याची खरेदी पूर्ण झाली असून, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळाही सज्ज झाल्या आहेत. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी यंदाही प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

नागपूर - जवळपास दीड महिन्याच्या सुटीनंतर विदर्भातील शाळा मंगळवारपासून सुरू होणार आहेत. नवीन वह्या-पुस्तके, नवे दप्तर यांसह शैक्षणिक साहित्याची खरेदी पूर्ण झाली असून, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळाही सज्ज झाल्या आहेत. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी यंदाही प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

शाळेचा पहिला दिवस मुलांसाठी अतिशय आनंद देणारा ठरतो. अन्य बोर्डाच्या शाळा यापूर्वीच सुरू झाल्यात, तर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा मंगळवारपासून सुरू होत आहेत. गेला दीड महिना काहीसे निवांत आयुष्य जगणाऱ्या पालकांची धावपळ आता पुन्हा सुरू होणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी उशीर होऊ नये, यासाठी सकाळपासून पाल्यासोबत पालकांचीही लगबग सुरू होते. बास्केटमध्ये डबा, रुमाल व्यवस्थित आहे किंवा नाही इथपासून शाळेत सोडण्यापर्यंत पालकांना धावपळ करावी लागते. यामुळे शाळेचा पहिला दिवस हा जितका विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असतो तितकाच तो पालकांसाठी असतो. यामुळेच मंगळवारी शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे. 

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जातील. शाळेच्या पहिल्या दिवसाचा घंटानाद ऐकण्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण राहणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध शाळांकडून वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. 

भेटी लागी जिवा... 
पावसाळा म्हटल्यावर ज्याप्रमाणे वारकऱ्याला पंढरीची आस लागते. त्याचप्रमाणे पावसाळ्याची सुरुवात ही शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण करून देते. शाळेचा पहिला दिवस म्हणजे जिवलग मित्र-मैत्रिणींना दीर्घ सुटीनंतर भेटण्याचा क्षण. तर अनेकांसाठी शालेय जीवनाचा शुभारंभ. नवीन वर्ग, नवे शिक्षक या साऱ्यांचेच कुतूहल. नवीन पुस्तके, नवा गणवेश, दप्तर इतरांना दाखविण्याचा आनंद निराळाच असतो. मंगळवारी सर्वच शाळांमध्ये असे चित्र दिसून येणार आहे. 

सुटीचा आनंद एका दिवसाने वाढला 
सुटी कुणाला नको असते. त्यातल्या त्यात शालेय जीवन म्हटले की सर्वांत आवडती गोष्ट म्हणजे सुटी. चिमुकल्यांच्या आवडत्या उन्हाळी सुट्यांचा आनंद यंदा एका दिवसाने वाढला. एरव्ही प्रत्येक वर्षी 26 जून रोजी सुरू होणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा यंदा 27 जून रोजी सुरू होणार आहेत. रमजान ईदनिमित्त आलेल्या सार्वजनिक सुटीमुळे शाळा सुरू होण्यास एक दिवस विलंब झाला. मात्र, हा एक दिवसाचा विलंब चिमुकल्यांसाठी सुटीचा एक दिवस वाढविणारा ठरला.

Web Title: nagpur news school