शाळेत आले नाही तरी चालेल फक्त प्रवेश घ्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

नागपूर - खासगी क्‍लासेस आणि विनाअनुदानित शाळांच्या टायअपमुळे शहरातील  अनेक नामवंत शाळा, महाविद्यालयांना विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. यामुळे आमच्याही शाळांमध्ये प्रवेश घ्या, शाळेत येण्याची गरज नाही, कुठल्याही खासगी शिकवणीत जाण्याची मुभा देऊ, असे आवाहन अनुदानित महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक संघाच्या वतीने पालकांना करण्यात आले आहे. 

अनुदानित  शाळांमध्ये उपस्थिती महत्त्वाची असते. त्याशिवाय परीक्षेला बसू दिले जात नाही. प्रॅक्‍टिकल परीक्षेचे गुणही दिल्या जात नाही. दुसरीकडे विद्यार्थी संख्या प्रचंड वाढल्याने दिवसभर क्‍लासेस घेतल्या जातात. त्यामुळे कुठल्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा याचा निर्णय अलीकडे क्‍लासेसतर्फेच घेतला जातो. त्याशिवाय प्रवेशच दिला जात नाही. विनाअनुदानित शाळेत प्रवेश घेतल्यास उपस्थिती कागदावर दाखविली जाते. विद्यार्थ्याला शाळेत जाण्याची गरज भासत नाही. 

क्‍लासेससोबतच्या टायअपमुळे विनाअनुदानित शाळांना आयते विद्यार्थी मिळतात, याशिवाय शाळेचा निकाल शंभर टक्के लागतो. या अभद्र युतीमुळे अनुदानित तसेच नावाजलेल्या शाळा, महाविद्यालयांना विद्यार्थी मिळणे अवघड झाले आहे. 

...तर शाळा बंद करण्याची वेळ
 पाच-सात वर्षांपूर्वी उघडलेल्या शाळांचा निकाल शंभर टक्के लागत आहे तर दुसरीकडे  अनुदानित शाळा गुणवत्ता यादीत आपल्या विद्यार्थ्यांची नावे शोधावी लागत आहे. असेच सुरू राहिल्यास शाळा बंद करण्याची वेळ येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याकरिता अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना नियमित वर्ग घेण्यापासून सवलत देऊ  केली आहे. प्रवेशासाठी नाममात्र शुल्क आकारण्याचेही ठरवले आहे. 

अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचे शुल्क बरेच कमी आहे. उपस्थितीचाही नियम शिथिल करण्याची तयारी दर्शविण्याच्या संस्थाचालक मंडळाच्या निर्णयाचे आपण समर्थन करतो. 
-रवींद्र फडणवीस, सहसचिव, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ.

Web Title: nagpur news school admission