गणवेशाचा तिढा कायम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

नागपूर - महापौर नंदा जिचकार यांनी ३१ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश द्या, अन्यथा कारवाई करणार, असा इशारा दिला होता. राज्य शासनाच्या जीआरमुळे महापालिका शाळातील विद्यार्थ्यांना गणवेशाचा तिढा कायम असून महापौर आता कुणावर कारवाई करणार? याकडे  सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नागपूर - महापौर नंदा जिचकार यांनी ३१ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश द्या, अन्यथा कारवाई करणार, असा इशारा दिला होता. राज्य शासनाच्या जीआरमुळे महापालिका शाळातील विद्यार्थ्यांना गणवेशाचा तिढा कायम असून महापौर आता कुणावर कारवाई करणार? याकडे  सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शाळा सुरू होऊन महिना लोटला. परंतु, अद्याप मनपा शाळेतील गरीब विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहे. राज्य शासनाने सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत महापालिकेला निधी दिला असून, तोकड्या निधीमुळे महापालिकेने त्यात भर घातली. परंतु, गणवेश खरेदीची पावती दाखविल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या राज्य शासनाच्या जीआरमुळे गोंधळ उडाला आहे. बॅंका खात्यात किमान शिल्लक रकमेसाठी अडल्यामुळे अनेक गरीब पालकांनी खाते काढले नाही. याशिवाय ज्याची खाते काढण्याची ऐपत आहे. त्यांना मुलांचे आधार कार्ड काढणे कठीण झाले आहे. सद्यस्थितीत आधार कार्ड काढणे बंद झाल्याने काही पालकांची निराशा झाली आहे.  एकीकडे बॅंकांकडून किमान रकमेची सक्ती व दुसरीकडे आधार कार्ड निघत नसल्याने पालक पेचात सापडले आहेत. त्यामुळे शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना गणवेश देणे शक्‍य होत नसल्याचे  एकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ३१ जुलैपर्यंत महापौरांनी दिलेली मुदत आज संपुष्टात आली. महापौरांच्या कारवाईच्या इशाऱ्यामुळे शिक्षक, अधिकाऱ्यांत खळबळ माजली असून विनाकारण कारवाई करण्याऐवजी महापौरांनी जिल्हा प्रशासन व बॅंकांना जाब विचारावा, असेही काही शिक्षकांनी सांगितले.  

१६ हजार विद्यार्थी आधार कार्डशिवाय 
महापालिकेच्या शाळांमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मिळून २१ हजार ५५३ विद्यार्थी आहेत. यापैकी, दहा दिवसांपूर्वी १२ हजार ९४३ विद्यार्थ्यांचे बॅंक खाती उघडण्यात आली आहेत. ३० जुलैपर्यंत यात दीड हजार विद्यार्थ्यांची भर पडली. दुसरीकडे १६ हजार विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही. विशेष म्हणजे, ३० जुलै रोजी शिक्षणाधिकाऱ्यांनी महासभेत ७० टक्के बॅंक खाती उघडल्याची माहिती दिली होती. परंतु, विद्यमान आकडे बघता खोटी माहिती सभागृहात दिल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
गेल्या महिनाभरापासून आधार कार्ड तयार करण्याचे काम बंद आहे. विद्यार्थ्यांचे बॅंक खाते व आधार कार्ड क्रमांक जोडण्यात येणार आहे. परंतु, कामच बंद असल्यामुळे महापालिकेने गणवेशाची समस्या आणखी तीव्र झाली. त्यामुळे शिक्षण विभागाने याबाबतचे जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले असून आधार कार्ड काढण्याच्या प्रक्रियेची प्रतीक्षा केली जात आहे. 

बॅंकांचा किमान शिल्लकसाठी आग्रह  
विद्यार्थ्यांना गणवेशासाठी ६०० रुपये दिले जात आहे. थेट बॅंक खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे. मात्र, बॅंकांनी खात्यात किमान शिल्लकसाठी आग्रह धरला आहे. एक ते पाच हजारापर्यंत किमान शिल्लकची बॅंका मागणी करीत असल्याने गरीब पालकांपुढे पेच निर्माण झाला आहे. महापौर नंदा जिचकार यांनी बॅंकाना झिरो बॅलेन्सवर खाते उघडण्यासाठी पत्र पाठविल्याचे सांगितले होते, परंतु महापौरांच्या शब्दालाही बॅंकाकडे स्थान नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: nagpur news school uniform