सायन्स एक्‍स्प्रेस सोडणार आज नागपूर स्टेशन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नागपूर - जगातील पर्यावरणाचा वेध घेत भविष्यातील धोक्‍याचा इशारा देणारी सायन्स एक्‍स्प्रेस गेल्या दोन दिवसांपासून नागपूर रेल्वेस्थानकावर पर्यावरण सांभाळण्याचा, मानवी जीवन वाचविण्याचा संदेश देत उभी आहे. गेल्या दोन दिवसात शेकडो शाळांच्या पंधरा ते वीस हजार विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला आहे. गुरुवार शेवटचा दिवस असून, सायंकाळी पाच वाजता नागपूरच्या फलाट क्रमांक ८ वर उभी असलेली सायन्स एक्‍स्प्रेस पुढच्या प्रवासाला रवाना होणार आहे. दिवसभराची अखेरची संधी नागपूरकरांसाठी आहे, याचा लाभ घ्यावा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

वातावरणीय बदलाच्या समस्येला आळा घालण्याच्या  दृष्टीने अल्पकालावधीत अनुकूल उपाययोजनांबाबत जनजागृती करण्याचा उदात्त हेतू ठेवून सायन्स एक्‍स्प्रेस देशभरात धावत आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, वन, पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन विभाग, जैवतंत्रज्ञान विभाग, रेल्वे मंत्रालय, भारतीय वन्यजीव संस्था आणि विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटरतर्फे सायन्स एक्‍स्प्रेस सुरू केली आहे. सोळा डब्यांची ही सायन्स एक्‍स्प्रेसमधील  ८ डब्यातून भारत सरकारच्या पर्यावरण, वन, आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाशी संबंधित माहिती देण्यात आली आहे. याशिवाय ९ ते ११ डब्यांमध्ये विज्ञान आणि प्राद्योगिकी विभागासह जैवविविधता विभागाचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. याशिवाय निसर्ग संरक्षणाची माहिती सायन्स एक्‍स्प्रेसमधील प्रदर्शनात आहे.

विद्यार्थ्यांसाठी किड्‌स झोन 
तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘किड्‌स झोन’ तयार करण्यात आले. येथे विद्यार्थ्यांच्या मेंदूला चालना देणाऱ्या व्यायामाची माहिती चित्रातून देण्यात आली. पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश विविध खेळांतून दिला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे १२ वेळा सायन्स एक्‍स्प्रेसची ‘लिमका बुक’मध्ये नोंद झाली आहे. 

सायन्स एक्‍स्प्रेसचे हे नववे वर्ष आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते १७ फेब्रुवारी २०१७ रोजी हिरवी झेंडी दाखवण्यात आली. सायन्स एक्‍स्प्रेसचा सुरू झालेला प्रवास १९ हजार किलोमीटरचा आहे. आगामी ८ सप्टेंबर २०१७ पर्यंत देशभरातील ६८ रेल्वेस्थानकांवर सायन्स एक्‍स्प्रेसचा मुक्काम असेल. या प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आजचा दिवस नागपूरकरांकडे आहे. 
- प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Web Title: nagpur news science express nagpur railway station