राजगुरू नागपूरला आले खरेेेे; पण...

राजेश प्रायकर
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नागपूर - क्रांतिकारक शहीद शिवराम हरी राजगुरू नागपुरात आल्याची नोंद एका संस्थेच्या सुवर्णमहोत्सव व हीरक महोत्सवानिमित्त काढलेल्या स्मरणिकेत आढळून आले. परंतु, ते इंग्रजांविरुद्ध संतापाने पेटून एका क्रांतिकारी योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपुरात आले होते, अशी नोंद आहे. मात्र, ते संघाचे स्वयंसेवक असल्याची नोंद कुठेही नसल्याने संघाचे माजी प्रचारक नरेंद्र सहगल यांनी त्यांच्या पुस्तकातून केलेल्या दाव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

नागपूर - क्रांतिकारक शहीद शिवराम हरी राजगुरू नागपुरात आल्याची नोंद एका संस्थेच्या सुवर्णमहोत्सव व हीरक महोत्सवानिमित्त काढलेल्या स्मरणिकेत आढळून आले. परंतु, ते इंग्रजांविरुद्ध संतापाने पेटून एका क्रांतिकारी योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपुरात आले होते, अशी नोंद आहे. मात्र, ते संघाचे स्वयंसेवक असल्याची नोंद कुठेही नसल्याने संघाचे माजी प्रचारक नरेंद्र सहगल यांनी त्यांच्या पुस्तकातून केलेल्या दाव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

संघाचे माजी प्रचारक नरेंद्र सहगल यांनी त्यांच्या ‘भारत वर्ष की सर्वांग स्वतंत्रता’ या पुस्तकातून शहीद राजगुरू नागपुरातील संघाच्या मोहिते वाडा शाखेचे स्वयंसेवक होते, असा दावा केला  आहे. त्यामुळे राजकीय, सामाजिक क्षेत्रात या मुद्द्यावरून चर्चेचे गुऱ्हाळ उठले आहे. स्वातंत्र्य लढ्यात संघाचा सहभाग असल्याचे दाखविण्यासाठी राजगुरू संघाचे स्वयंसेवक असल्याचा दावा केला जात असल्याचीही यानिमित्त चर्चा रंगली आहे. मात्र, सहगल यांच्या पुस्तकातील  दाव्यानुसार राजगुरू नागपुरात आले होते, हे खरे आहे.

मात्र, ते स्वयंसेवक असल्याची नोंद नाही. इतिहासातील नोंदीनुसार लाहोर येथे १७ डिसेंबर १९२८ रोजी सॅंडर्सच्या हत्येनंतर तीन दिवसांनी अर्थात २० डिसेंबर १९२८ रोजी राजगुरूंसह सुखदेव, भगतसिंग भूमिगत झाले. त्यानंतर ३० डिसेंबर १९२९ रोजी राजगुरू यांना पुण्यात अटक करण्यात आली. अर्थात ते एक वर्ष भूमिगत होते. याच काळात ते नागपुरात आले. याबाबतची नोंद नागपुरातील लकडगंज येथील अनाथ विद्यार्थी गृहाच्या सुवर्णमहोत्सव व अमृतमहोत्सवानिमित्त काढलेल्या स्मरणिकेत आहे. या संस्थेचा सुवर्णमहोत्सव १९७४-७५ मध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्त काढलेल्या स्मरणिकेत तत्कालीन एका वृत्तपत्राच्या संपादकांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत राजगुरू यांनी अनाथ विद्यार्थी गृहाला दिलेल्या भेटीचा तसेच प्रत्यक्ष त्यांना बघण्याचा योग आल्याचे नमूद केले आहे. हा किस्सा लिहिताना संपादकांनी सुरुवातीलाच ’४५ वर्षे लोटली त्या प्रसंगाला’ असे नमूद केले. त्यामुळे राजगुरू १९२९ मध्ये शहरात होते, यास दुजोरा मिळत  आहे. मात्र, ते नेमके किती काळ होते, याबाबत स्पष्ट नोंद नाही. या संपादकांनी पुढे लिहिले आहे की, त्यांच्या वडिलांनुसार राजगुरू इंग्रजांच्या ताब्यातील सीताबर्डी किल्ला उद्‌ध्वस्त करण्याच्या क्रांतिकारी योजनेसह आले होते. मात्र, नागपूरच्या तत्कालीन सुज्ञ मंडळींनी त्यांच्या उत्साहाला आवर घातल्याचे या स्मरणिकेत म्हटले आहे. त्यानंतर राजगुरू नागपूर सोडून निघून गेले अन्‌  पुढे त्यांना पुण्यात अटक झाल्याचे म्हटले आहे. राजगुरू एक वर्ष भूमिगत होते, यातील फक्त काही काळ ते नागपुरात होते. या काळात ते संघाच्या कुठल्या शाखेत जायचे, याबाबत नागपुरात कुठेही नोंद नाही. त्यामुळे सहगल यांच्या दाव्यावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

राजगुरू स्वयंसेवक नव्हते - मा. गो. वैद्य
नागपूर ः राजगुरू क्रांतिकारक होते. स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या अनेक संघटनांशी त्यांचा संबंध  होता. ते नागपूरलासुद्धा येऊन गेले. मात्र, ते स्वयंसेवक नव्हते तसेच संघाच्या शाखेत आल्याचे आपणास स्मरत नाही, असे ज्येष्ठ स्वयंसेवक व विचारवंत मा. गो. वैद्य यांनी म्हटले आहे.  संघाचे माजी प्रचारक नरेंद्र सहगल यांनी राजगुरू हे स्वयंसेवक होते असा दावा पुस्तकात केला असल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मा. गो. वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राजगुरू यांना फाशी झाली तेव्हा संघाची स्थापना नुकतीच झाली होती. संघाचा व्याप त्यावेळी मोठा नव्हता. मी नियमित मोहिते वाडा येथील शाखेत जात होतो. येथे कधी राजगुरू  यांना बघितल्याचे स्मरत नाही. सहगल यांनी कुठल्या आधारावर दावा केला हे माहीत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news shivram hari rajguru