दहावी, बारावी सीबीएसईचे दोन पेपर नव्याने 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

नागपूर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचा बुधवारी (ता. 28) झालेला गणित (मॅथमॅटिक्‍स) आणि 26 तारखेला बारावीचा अर्थशास्त्र (इकॉनॉमिक्‍स) पेपर दिल्लीत व्हायरल झाल्याची बातमी आली. यावरून सीबीएसईने हे दोन्ही पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. यावर पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून या निर्णयाने विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण येणार आहे. 

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षांना पाच मार्चपासून सुरुवात झाली. 26 मार्चला बारावीचा अर्थशास्त्र तर बुधवारी (ता. 28) दहावीचा गणिताचा पेपर घेण्यात आला. मात्र, काही वेळातच गणित आणि त्यापूर्वी अर्थशास्त्र या विषयाचे पेपर मोबाईलवर व्हायरल झाल्याची माहिती समोर आली. यावरून सीबीएसईने तत्काळ हे दोन्ही पेपर नव्याने घेण्याचे ठरविले. या निर्णयाचा फटका देशभरातील विद्यार्थ्यांना बसला आहे. शहरात दहावीच्या तीस शाळांमधून पाच हजार तर बारावीच्या वीस शाळांमधून दीड हजारावर विद्यार्थी सीबीएसईद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये बसले होते. अचानक झालेल्या निर्णयामुळे पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेकांनी ही बातमी खरी आहे काय? असाच प्रश्‍न उपस्थित केला. विशेष म्हणजे या निर्णयावर अनेक पालकांनी रोष व्यक्त करून त्यामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण होणार असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच अनेकांनी याबद्दल न्यायालयात जाण्यासंदर्भातही चर्चा केली. सीबीएसईकडून नव्या तारखा अद्याप देण्यात आलेल्या नसल्याने पालकांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. 

सीबीएसईसारख्या मंडळाद्वारे पेपरच्या सुरक्षिततेवर उपाययोजना करण्यात येत नसल्यास आता विद्यार्थ्यांचे भविष्य खरोखरच सुरक्षित आहे काय? असा प्रश्‍न पडायला लागला आहे. राज्य बोर्डात ही बाब सातत्याने होत असताना, सीबीएसईने दुर्लक्ष केल्यानेच हा प्रकार घडल्याचे दिसून येते. आता त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असून विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येणार आहे. 
- अवंतिका लेकुरवाळे, पालक. 

Web Title: nagpur news ssc hsc CBSE Two papers renewed