एसटी महामंडळाच्या परीक्षेत गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

नागपूर - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे विविध पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेअंतर्गत रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. लोणारा येथील झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथे परीक्षेदरम्यान चांगलाच गोंधळ झाला. उमेदवारांनी निदर्शने आणि खुर्च्या भिरकावून रोष व्यक्त केला. ऐनवेळी पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नागपूर - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे विविध पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेअंतर्गत रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. लोणारा येथील झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथे परीक्षेदरम्यान चांगलाच गोंधळ झाला. उमेदवारांनी निदर्शने आणि खुर्च्या भिरकावून रोष व्यक्त केला. ऐनवेळी पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे नागपूर विभागातील उमेदवारांची शहरातील चार केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथे २१ खोल्यांमध्ये एक हजार २०० परीक्षार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेची वेळ ११.३० असली तरी काही खोल्यांमध्ये अर्धातास लोटूनही पेपर आले नाही. यामुळे उमेदवारांनी वर्गाबाहेर पडत घोषणा देण्यास प्रारंभ केला. अन्य वर्गात जाऊन पेपर सोडवणाऱ्या उमेदवारांचे पेपर हिसकावले, खुर्च्या भिरकावल्या. उमेदवारांचा वाढता रोष लक्षात घेऊन महाविद्यालय प्रशासनाने पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी मध्यस्थीचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला. काही वेळातच एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारीही दाखल झाले. या प्रकाराबाबत महामंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयाला घटनेची माहिती देण्यात आली. 

बाकांवर रीतसर क्रमांक नव्हते. सोयीने बसण्याची मुभा उमेदवारांना होती.  पेपर आणि उत्तर पत्रिकेचे पाकीट सीलबंद नव्हते. सुरक्षेचे उपाय नाहीत, नियम धाब्यावर बसवून इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे हाताळण्याची सुविधा देण्यात आल्याचा आरोप उमेदवारांनी केला. 

उमेदवारांची निदर्शने 
शहरातील चार केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार होती. झुलेलाल इन्स्टिट्यूटमध्ये गोंधळामुळे परीक्षा चांगलीच गाजली. जरीपटका परिसरातील केंद्रातील विद्यार्थ्यांमधूनही शंकेचा सूर उमटला. या केंद्रावरील २५ ते ३० उमेदवारांनी सायंकाळच्या सुमारास संविधान चौकात एकत्र येत निदर्शने केली. पेपर रद्द करण्याची मागणी या उमेदवारांकडूनही करण्यात आली.

खासगी संस्थेमार्फत परीक्षा
प्रक्रियेसाठी एसटी महामंडळाने आरसीस इन्फोटेक नामक कंपनीची नेमणूक केली असल्याची माहिती आहे. परीक्षा घेण्याची जबाबदारी या संस्थेवरच आहे. चारही केंद्रांवर प्रत्येकी एक अधिकारी महामंडळाकडून पाठविण्यात आला होता. झुलेलाल इन्स्टिट्यूट येथील केंद्रावर २१ पैकी १९ खोल्यांवर निरीक्षक वेळेवर पोहोचले. दोन खोल्यांवर निरीक्षक उशिरा पोहोचले. यामुळेच हा प्रकार घडल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.

पेपरफुटीचा प्रकार घडला नाही. योग्य नियोजनाअभावी अव्यवस्था झाली. खासगी संस्थेकडून परीक्षा घेण्यात येत असून महामंडळाचा काहीच संबंध नाही. झुलेलाल इन्स्टिट्यूट केंद्रावरील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेची नवीन तारख निश्‍चित करून २ दिवसांच्या आत महामंडळाच्या संकेतस्थळावरून ती जाहीर करण्यात येईल. शहरातील चारही केंद्रांवर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रश्‍नपत्रिकांचे सील तपासल्यानंतरच प्रश्‍नसंच वितरित करण्यात आले.
- सुधीर पंचभाई, विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ.

Web Title: nagpur news st mahamandal exam