गुजरात निकालानंतर आक्रमक पवित्रा

गुजरात निकालानंतर आक्रमक पवित्रा

नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मंगळवारी सकाळी नागपुरातील विधानभवनातील कार्यालयात तातडीने बैठक झाली. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. गुजरात विधानसभेच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी ही बैठक झाल्यानंतर महत्त्वाचे मानले जात आहे. गुजरातचे निकाल आशादायी असल्याने भाजपच्या विरोधात आक्रमक होण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले आहेत. यावेळी भाजपची ‘बी टीम’ ओळख पुसण्याचेही राष्ट्रवादीने ठरविल्याचे समजते. गुजरात विधानसभेच्या निकालामध्ये भाजपला जोरदार धक्का बसला आहे. गुजरातमध्ये भाजपला १०० चा आकडाही गाठता आला नाही व दुसऱ्या बाजूला कोणत्याही एक्‍झिट पोल व वृत्तवाहिन्यांनी काँग्रेसला गृहीत धरलेले नसताना काँग्रेसची कामगिरी उजवी ठरली आहे.  यातून जनमानसाचा कल कोणत्या दिशेने आहे, याचे संकेत मिळाले आहेत.

याच निकालाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मते जाणून घेतल्याचे समजते. राज्यात फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची आतून ‘गट्टी’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश जात आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची विरोधी पक्षाच्या प्रतिमेपेक्षा भाजपच्या अधिक जवळचा पक्ष, अशी इमेज तयार होत असल्याचे कार्यकर्त्यांना वाटते.

ही भावना दूर करण्यासाठी गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादीकडून प्रयत्न करण्यात आले. गुजरातच्या निकालानंतर भाजपला टक्कर देता येते, हे स्पष्ट झाले आहे. मोदींच्या गृहराज्यातच काँग्रेसने दमदारपणे टक्कर दिल्याने विरोधकांचे मनोबल उंचावले आहे. यामुळे भाजपच्या धोरणांचा जोरदारपणे विरोध करण्याची आवश्‍यकता असल्याचे यावेळी तटकरे यांनी सांगितले. गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ४५ मतदारसंघांमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच सदस्य निवडून आला आहे. अनेक सदस्यांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या. अधिवेशनाच्या उर्वरित काळात तसेच भविष्यात राज्य सरकारच्या धोरणांचा कडाडून विरोध करून जनतेचे प्रश्‍न मांडण्याचे आवाहन तटकरे यांनी केले. भाजपच्या जवळचा ही प्रतिमा पुसून टाकण्यासाठी आक्रमक होण्याची आवश्‍यकता असल्याचे तटकरे यांनी सांगितले. 

तत्काळ आक्रमक
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदारांना आक्रमक होण्याचे निर्देश दिल्यानंतर लगेच याची प्रचिती विधान परिषदेत दिसून आली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी गोंधळ घातल्याने परिषदेचे कामकाज तहकूब करावे लागले. विधानभवनाच्या  समोरही राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com