स्वाइन फ्लूच्या मृत्यूत विदर्भ दुसऱ्या क्रमांकावर

स्वाइन फ्लूच्या मृत्यूत विदर्भ दुसऱ्या क्रमांकावर

नागपूर - वाढत्या तापमानातही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होता. पावसामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूला पोषक वातावरण निर्माण झाल्याने मृत्युसंख्येतही वाढ होत आहे. बाधितांचे मृत्युसत्र वेगाने सुरू आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत उपराजधानीत पाच जण दगावले, तर १७ जणांना लागण झाली. आठ महिन्यांत राज्यात ५०५ मृत्यू झालेत. यात पुण्यात १८४ जण स्वाइन फ्लूने दगावले, तर विदर्भात ७७ जणांचा बळी घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

स्वाइन फ्लूमुळे मुंबईत आठ महिन्यांत ३२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाचे नव्हे, तर राज्य शासनाचे लक्ष राजधानी मुंबईवर आहे. विदर्भात ७७ मृत्यू  झाल्यानतंरही आरोग्य विभाग, महापालिकेने योग्य ती दखल घेऊन नियंत्रणासाठी ठोस पावले उचलले नसल्याचे दिसून येते. विदर्भात सहा वर्षांपासून स्वाइन फ्लूची दहशत आहे. दरवर्षी  स्वाइन फ्लू डोकेवर काढते. अकोला विभागात २८, तर नागपूर विभागात ४९ मृत्यू झाल्याची  नोंद आरोग्य विभागात आहे. नाशिक विभागात स्वाइन फ्लूने ६५ मृत्यू झाले आहेत. यानंतर औरंगाबाद विभागात ३९, कोल्हापूर विभागात ४५, ठाणे विभागात ५८ जण स्वाइन फ्लूने दगावले. लातूर विभागात ५ मृत्यू झाले आहेत.

वॉर्ड कधी सुरू होईल?
विदर्भातील स्वाइन फ्लू बाधितांसह दरवर्षी स्वाइन फ्लू, हिवताप, डेंगी, गॅस्ट्रो या संसर्गजन्य आजारांवरील नियंत्रणासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचा प्रस्ताव २००९ मध्ये डीपीसीकडे सादर केला होता. मेडिकलचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु, विद्यमान अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी पुढाकार घेत एक कोटी ९१ लाख रुपये  खर्चातून स्वाइन फ्लू वॉर्ड तयार केला. परंतु, अद्याप येथे रुग्णांवर उपचाराची सोय अद्याप झाली नाही. मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक २५ मध्येच सोय केली आहे.

विदर्भात ३६३ बाधित
राज्यात स्वाइन बाधितांची संख्या चार हजार ७१५ आहे. यापैकी सर्वाधिक स्वाइन बाधित मुंबई (१,३०१), ठाणे (१,१५०) पुण्यामध्ये (९९०) आढळले आहेत. यानंतर नाशिकमध्ये ३८०, तर कोल्हापूरमध्ये ३१६ बाधित आढळलेत. विदर्भात स्वाइन फ्लू बाधितांची संख्या ३६३ आहे. यापैकी ७७ जण स्वाइन फ्लूने दगावले आहेत.

भंडारा जिल्ह्यात स्वाइन फ्लूने चौघांचा बळी
सुवर्णकार व्यावसायिकाचा रविवारी नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण असल्याचे उघड झाल्यानंतर आरोग्य विभाग खळबडून जागे झाले. आता जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण चार संशयिताचा मृत्यू झाला असून, त्यातील दोघांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे जिल्ह्यात आणखी संशयित असण्याचा संशय निर्माण झाला आहे.

भंडारा शहरातील शाहिदा बेगम (वय ५५) यांना मे महिन्यात शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या स्वाइन फ्लूच्या संशयित असल्यामुळे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. परंतु, रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना स्वाइन फ्लूची  लागण झाल्याचा अहवाल विभागाला प्राप्त झाला होता. विभागाद्वारे त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी करून आजाराची लागण झाली नसल्याची खात्री केली होती. ऑगस्ट महिन्यात संतोष मोहबे (वय ४९) यांना आजारपणामुळे नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचासुद्धा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.

सामान्य लक्षणे 
स्वाइन फ्लू (एचवन एनवन) हा आजार असलेल्या व्यक्तीला सौम्य ते मध्यम ताप, घसादुखी, खोकला, नाक वाहणे, अंगदुखी व डोकेदुखी अशी लक्षणे आढळतात. लहान बाळाला अतिप्रमाणात लाळ गळताना आढळते. लहान मुले, वृद्ध गरोदर माता यांच्यासह मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंड, यकृताचे आजार असलेले रुग्ण अतिजोखमीचे ठरतात. या व्यक्तींना स्वाइन फ्लूची लागण झाल्यास गंभीर स्वरूप धारण करण्याची भीती असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com