चोरी 390 रुपयांची;  निकाल 29 वर्षांनंतर! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नागपूर - चोरीच्या एका प्रकरणाचा निकाल तब्बल 29 वर्षांनंतर लागला. सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ही चोरी लाख-दोन लाखांची सोडा, तर साधी हजारांतही नव्हती. फक्त 390 रुपये चोरीचे हे प्रकरण होते. 

नागपूर - चोरीच्या एका प्रकरणाचा निकाल तब्बल 29 वर्षांनंतर लागला. सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ही चोरी लाख-दोन लाखांची सोडा, तर साधी हजारांतही नव्हती. फक्त 390 रुपये चोरीचे हे प्रकरण होते. 

या प्रकरणात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने चोरट्याला कलम 457 व 380 अंतर्गत प्रत्येकी 15 दिवसांचा कारावास व 200 रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन दिवस अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. मो. शाहिद वल्द नेवल मो. हफीज असे आरोपीचे नाव आहे. तो मोमीनपुरा येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध जागनाथ बुधवारी येथील मो. हुसेन वल्द अली हुसेन यांनी तहसील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. 11 नोव्हेंबर 1989 ला मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. मोमीनपुरा येथे फिर्यादीचे जनरल स्टोअर्स आहे. आरोपीने दुकानाच्या खिडकीतून आत शिरून रोख 390 रुपये चोरले होते. आरोपीला 8 डिसेंबर 1989 रोजी अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. पोलिस उपनिरीक्षक मो. इकबाल यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायाधीश एम. टी. खराटे यांनी हा निर्णय दिला. सरकारतर्फे ऍड. व्ही. डी. हुकरे यांनी बाजू मांडली. 

Web Title: nagpur news theft Rs 390 crime news