न्यायालयाच्या निर्णयानुसारच शिक्षिकेची बदली - विनोद तावडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

नागपूर - शिक्षण विभागाद्वारे राबविलेल्या समायोजनाच्या प्रक्रियेत मुंबईच्या चेंबूरमधील डॉ. भीमराव आंबेडकर शाळेतील शिक्षिका जयश्री ढोरे यांचे समायोजन नागपूर येथील नवयुग विद्यालयात केले. मात्र, हे समायोजन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशनानुसारच झाल्याचे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. या वेळी शिक्षक आमदार संघटनांना हाताशी धरून राजकारण करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

शिक्षक भरती करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे प्रकार होत असतात. शिक्षक भरतीसाठी काही संस्थाचालक शिक्षकांकडून लाखो रुपये उकळण्याचे प्रकार घडतात. अशा तक्रारी शिक्षकच करीत आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी व शिक्षक भरतीमधील तथाकथित भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकारने शिक्षकांची भरती केंद्रीयभूत पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. परंतु, या निर्णयाच्या विरोधात काही संस्थाचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका सादर केल्या. या याचिकांची सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने शिक्षक निवड पद्धती करताना याचिका कर्ता शिक्षण संस्थांना विहित कार्यपद्धती अवलंबून शिक्षक पदे भरण्याची परवानगी दिली.

शिक्षण संस्थांना जाहिरातीच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे हा विलंब टाळण्यासाठी कमी वेळेत अतिरिक्त शिक्षकांच्या यादीतून आवश्‍यक असलेले शिक्षक उपलब्ध करून देणे शक्‍य होते. 

संबंधित शिक्षण संस्थांनी त्यांच्या संस्थांमधील रिक्त पदांची माहिती कळविल्यानंतर शासकीय यंत्रणेने अतिरिक्त शिक्षक यादीतून आवश्‍यक असलेले शिक्षक सदर शिक्षण संस्थांना उपलब्ध करून द्यावेत असा निर्णय न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या निर्णयानुसार ढेरे यांचे समायोजन केले.

समायोजन प्रक्रियेचा अपप्रचार
नागपूर जिल्ह्यातील शिक्षक हे भाषा व समाजशास्त्र विषयाचे होते, तर काही शिक्षक विज्ञान विषयाचे आहेत. मात्र, गणित विषयासाठी एकही शिक्षक नागपूर विभागात अथवा जवळपासच्या विभागात उपलब्ध नसल्यामुळे संबंधित शिक्षण संस्थेस मुंबई येथून शिक्षक उपलब्ध करून दिले. या समायोजन प्रक्रियेचा अपप्रचार करून काही आमदार संस्थाचालकांना भरतीचे रान मोकळे करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रीयभूत शिक्षक निवड पद्धतीला विरोध करीत आहेत, अशी टीकाही विनोद तावडे यांनी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news Transfer of teacher according to the decision of the court