शहरातून रोज जातात  दोन वाहने चोरीला 

अनिल कांबळे 
शुक्रवार, 23 मार्च 2018

नागपूर - नागपूर शहरातून पाच हजारांपेक्षा जास्त वाहनांची चोरी झाली आहे. यामध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. चोरी झालेल्या वाहनांच्या तक्रारींच्या निपटाऱ्याचे प्रमाण केवळ ३५ टक्‍केच आहे. त्यामुळे अनेकजण वाहन चोरी गेल्यानंतर ते परत मिळण्याची आशा सोडून देतात. सरासरीनुसार शहरातून दररोज दोन वाहने चोरीला जातात.

नागपूर - नागपूर शहरातून पाच हजारांपेक्षा जास्त वाहनांची चोरी झाली आहे. यामध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. चोरी झालेल्या वाहनांच्या तक्रारींच्या निपटाऱ्याचे प्रमाण केवळ ३५ टक्‍केच आहे. त्यामुळे अनेकजण वाहन चोरी गेल्यानंतर ते परत मिळण्याची आशा सोडून देतात. सरासरीनुसार शहरातून दररोज दोन वाहने चोरीला जातात.

शहर पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी बीट सिस्टिम आणि अन्य गस्तप्रणालीवर भर देऊन पोलिस विभागात पुरोगामी बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुस्त धोरणामुळे शहरातील घरफोडी, चोरी, चेनस्नॅचिंग, वाहनचोरी, लूटमारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व प्रकारासाठी सदोष गस्तप्रणाली आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. शहरात दर दिवशी सरासरी दोन वाहने चोरी जातात. गेल्या तीन वर्षांत ५ हजार १६० वाहने चोरीला गेल्याची नोंद पोलिस दफ्तरी आहे. तर त्यापैकी केवळ १ हजार ४६० वाहनांचा शोध  लागला असून ती वाहने मूळ मालकाला सोपविण्यात आली आहेत. मात्र, दुचाकी चोरी गेल्यानंतर डिटेक्‍ट केल्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे अनेकांना वाहन चोरी गेल्यानंतर पोलिस तपास करून ते परत मिळेल, याची खात्री नसते. वाहन चोरीच्या गुन्ह्यांकडे किरकोळ तक्रारींसारखा थातूरमातूर तपास केला जातो. तसेच वाहनाच्या मालकालाच उलटसुलट प्रश्‍न विचारून पोलिस भंडावून सोडतात. त्यामुळे तपास कुठपर्यंत आला? असे विचारण्यासाठी वाहनमालक ठाण्यात येत नाहीत. अशाच दुर्लक्षित धोरणामुळे वाहनचोरांचे फावते तर वाहनचोरीच्या घटना वाढतात.

डिमांडनुसार केली जाते चोरी
वाहन चोरट्यांच्या टोळीचे ठरलेले विक्रेते-ग्राहक आहेत. त्यांना जे मॉडेल हवे आहे त्यानुसार वाहन चोरी करणारी टोळी गेल्या काही महिन्यांपूर्वी गणेशपेठ पोलिसांच्या हाती लागली होती. या टोळीला ज्या गाडीची मागणी आहे, तीच गाडी चोरून आणण्यासाठी ते चार ते पाच राज्ये खालसा करीत होते. पाहिजे तीच गाडी चोरल्यानंतर ग्राहकांपर्यंत अर्ध्या किमतीत विकण्यात येत होती. या टोळीला तत्कालीन एपीआय अनिल ताकसांडे यांनी अटक केली होती.

पोलिसांच्या मते, दुचाकी चोरीमध्ये अल्पवयीन मुलांसह नवीन तरुण येत आहेत. घरासमोर लावलेली दुचाकी रात्रीच्या वेळी चोरीला जाण्याच्या घटनाही घडत आहेत. बहुतांश घटनांमध्ये अल्पवयीन चोर टोळीत सहभागी असतात. पैशाची तातडीने गरज आहे, असे सांगून पाच-दहा हजारांना चोरीच्या दुचाकी विकल्या जात आहेत. 

Web Title: nagpur news Two vehicles are stolen daily from nagpur city