हेल्मेटचा दंड दोन कोटींच्या घरात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

पालकांनी हेल्मेट गिफ्ट द्यावे
मुलांच्या हट्टी स्वभावामुळे पालक लाख रुपये किमतीपर्यंतच्या बाइक घेऊन देतात. पालकांनी हजार रुपये अतिरिक्‍त खर्च करून मुलांना हेल्मेट गिफ्ट द्यावे. तेवढेच नव्हे तर बाइक चालविताना हेल्मेट घालण्याची सक्‍तीसुद्धा पालकांनी करावी, जेणेकरून बाइक घेऊन गेलेला मुलगा सुखरूप घरी परत येण्याची शाश्‍वती पालकांना राहील.

नागपूर - ‘हेल्मेट घाला रे’ याची वारंवार सूचना देऊनही वाहनचालक हेल्मेट घालत नसल्याने पोलिसांनी वर्षभरात ५५ हजार ९२१ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून तब्बल दोन कोटी सात लाख २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे वर्षभरात एक हजार ३७३ अपघात घडले असून डोक्‍याला मार लागल्याने २३२ जणांचा मृत्यू झाला. 

शहरातील झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये तरुणांची संख्या बरीच मोठी आहे. शहरात रिंग रोडवर सर्वाधिक ९१ अपघात झाले. या अपघातात ३५ जणांचा मृत्यू पावल्याची नोंद पोलिसांकडे आहे. सर्वाधिक अपघात दुचाकी आणि ट्रकमध्ये घडले असून त्यासाठी ओव्हर स्पीडने वाहन चालविणे कारणीभूत आहे. वर्षभरात वाहतूक पोलिसांनी १ हजार ३१७ वाहनचालकांवर ओव्हरस्पीडची कारवाई केली असून दीड लाख रुपयांचा दंडही वसूल केला  आहे. अनेक वेळा वाहनचालक वेगवेगळे कारण देऊन हेल्मेट नसल्याचे कारण पुढे करून वाहतूक पोलिसांच्या कारवाईतून सुटका मिळविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हलगर्जीपणा जिवावर बेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. मेट्रोच्या कामांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सध्या विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दिवसभर झटत असतात. मात्र, वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे रस्ते अपघात घडतात. सिग्नल तोडल्यामुळे अनेक गंभीर स्वरूपाचे अपघात घडल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.

माहितीच्या अधिकाराअंतर्गत अभय कोलारकर यांनी वाहतूक विभागाला वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती मागितली होती. त्यामध्ये वाहतूक पोलिसांनी सिग्नल जम्प करणाऱ्या वाहनचालकांची आकडेवारी जाहीर केली.

२० हजार ‘सिग्नल जम्पिंग’
वाहतूक नियमांची ऐशीतैशी करणाऱ्यांची संख्या लाखोंत आहेत. सिग्नल तोडणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे अनेक वाहनचालक बिनधास्त सिग्नल जम्पिंग करताना दिसतात. गेल्या वर्षभरात शहरातील २० हजार वाहनचालकांनी सिग्नल जम्प केला. वाहतूक पोलिसांनी त्या वाहनचालकांकडून तब्बल ३६ लाख ७८ हजार रुपयांचा घसघशीत दंड वसूल केला.

Web Title: nagpur news vidarbha news helmet fine recovery