४० गावांची तहान टॅंकरवरच! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

नागपूर - जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या दप्तरदिरंगाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. जून महिना सुरू होऊनही जिल्ह्यातील ४० गावांना ६३ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असून, या गावांची भिस्त अद्याप टॅंकरवर आहे. 

नागपूर - जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या दप्तरदिरंगाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. जून महिना सुरू होऊनही जिल्ह्यातील ४० गावांना ६३ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असून, या गावांची भिस्त अद्याप टॅंकरवर आहे. 

गतवर्षीच्या बोअरवेल कंत्राटदारांचा तिढा सोडविण्यास जिल्हा परिषद प्रशासनाने विलंब केल्याने त्याचे परिणाम जिल्ह्यातील नागरिकांना भोगावे लागले. भूजल सर्वेक्षण विभागाने यंदा जिल्ह्यातील १ हजार २३४ गावांमध्ये पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार उपाययोजना करण्याचे काम ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे होते. परंतु, या विभागाची दफ्तरदिरंगाई आणि पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे पाणीटंचाई निवारणाची कामे वेळेत सुरू झाली नाहीत.

परिणामी नागरिकांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. काही गावांना ते शक्‍य नसल्याने ४० गावांना अद्याप ६३ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी १,०८७ बोअरवेलची कामे,विहिरींचे अधिग्रहण, नळयोजनांच्या दुरुस्तीची कामे करायची होती. सद्य:स्थितीत केवळ ५२२ बोअरवेलची कामे झाली. तर २३३ विहिरी अधिग्रहणाची कामे झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी ३० जूनपर्यंत पाणीपुरवठ्यासंबंधी कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. पण, अजून ५०० हून अधिक बोअरवेलची कामे शिल्लक आहेत. त्यामुळे तेवढ्या कालावधीत ही कामे होतील का, याबाबत शंका आहे. ही कामे वेळेत पूर्ण न झाल्यास गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरूच राहण्याची शक्‍यता आहे. 

पाऊस लांबल्यास स्थिती गंभीर
हवामान विभागाने मॉन्सून यंदा वेळेत दाखल होण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर दुसरीकडे पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण झालेली नाहीत. यंदा पाऊस उशिराने सुरू झाल्यास जिल्ह्यातील बऱ्याच गावांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. 

विभाग रुळावर येणार का?
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला तीन महिन्यांच्या कालावधीनंतर कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता मिळाला. त्यामुळे या विभागाची रेंगाळलेली कामकाज रुळावर येणार का? दफ्तरदिरंगाईचा ठसा पुसण्यात या विभागात नव्याने रुजू झालेले
कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांना यश येणार का? असे विविध प्रश्‍न उपस्थित केले जात आहे.

जलाशयांनी गाठला तळ
हवामान विभागाने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी अद्याप मॉन्सूनबाबत अनिश्‍चिततेचे सावट आहे. येत्या आठ-दहा दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास विदर्भातील जलाशयांची स्थिती बिकट होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. नागपूर आणि अमरावती विभागात लहान, मोठे आणि मध्यम प्रकल्पांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सद्यस्थितीत नागपूर विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये ९.४९ टक्के, ४० मध्यम प्रकल्पात ११ टक्के, तर अमरावती विभागातील ९ मोठ्या प्रकल्पांत २५.१८ टक्के, २३ मध्यम प्रकल्पात १७.१० टक्के पाणीसाठा आहे.

Web Title: nagpur news vidarbha news water tanker