विनोद तावडेंना न्यायालयाचा दणका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

नागपूर - शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शालेय क्रीडा प्रकारांमधून वगळलेल्या आष्टेडू या खेळाच्या स्पर्धेला सरकारची मान्यता देण्याचे आदेश शुक्रवारी नागपूर खंडपीठाने दिले. महाराष्ट्र आष्टेडू मर्दानी आखाड्याचे सचिव राजेश तलमले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीने विनोद तावडे यांना चांगलाच दणका बसला आहे.

शालेय क्रीडा प्रकारांमधून 32 खेळ वगळण्यात आले आणि ऑलिंपिक किंवा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये खेळले जाणारे 43 खेळच या यादीत कायम ठेवण्यात आले. वगळण्यात आलेल्या 32 खेळांमध्ये आष्टेडू मर्दानी आखाड्याचाही समावेश आहे. राष्ट्रीय स्तरावरील शालेय स्पर्धांच्या वेळापत्रकात आष्टेडूसाठी भंडाऱ्याला यजमानपद मिळाले होते.

गेल्यावर्षी जूनमध्ये शासनातर्फे परवानगी मिळाली होती. मात्र, ऑगस्टमध्ये हा खेळ वगळण्याचा शासनादेश निघाला. यापूर्वी 2016 मध्ये ही स्पर्धा सरकारच्या अनुदानाशिवाय घेतली होती; मात्र त्याला सरकारची मान्यता होती. शिवकालीन खेळाचा प्रचार व्हावा, याच उद्देशाने यंदाही ही स्पर्धा स्वखर्चावर घेण्याची तयारी आहे. मात्र, सरकारमान्यता असल्याशिवाय त्याला दर्जा प्राप्त होणार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. ज्या 32 खेळांना यादीतून वगळले आहे, त्यांच्या स्पर्धा शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत घेऊ नयेत, असेही राज्य सरकारच्या आदेशात नमूद असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

काय आहे आष्टेडू?
आष्टेडू मर्दानी आखाडा हा शिवकालीन दांडपट्ट्याचा प्रकार आहे. पण, त्याचा शालेय खेळांमध्ये समावेश नसल्यामुळे दहा वर्षांपूर्वी त्याच्या नियम व अटी तयार करून मान्यता मिळविण्यात आली. आष्टेडू मर्दानी आखाडा या नावाने ओळखला जाणारा हा खेळ भारतासह 23 देशांमध्ये खेळला जातो. गेल्यावर्षी सातारा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकाविला होता. राज्यात या खेळाचे दोन लाख 35 हजार खेळाडू असल्याची माहिती आखाड्याचे सचिव राजेश तलमले यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

Web Title: nagpur news vinod tawde court