वन्यप्राणी गणना 20 जानेवारीपासून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

आकडे बोलतात.. 
वर्ष - वाघांची संख्या 
2006 - 1411 
2010 - 1706 
2014 - 2226

नागपूर - राज्यातील व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित जंगलातील प्राणी गणना 20 ते 25 जानेवारीदरम्यान होणार आहे. "ट्रान्झेक्‍ट' पद्धतीने होणारी ही गणना चार टप्प्यांत होईल. त्यामुळे संपूर्ण देशातील वाघांसह इतरही प्राण्यांची नेमकी संख्या कळू शकणार आहे. ही प्रक्रिया 15 मार्चपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देशही प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहे. 

मांसभक्षी आणि तृणभक्षक प्राण्यांची गणना राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रकल्प, अभयारण्य तसेच संचार प्रकल्पात होणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पात प्रशिक्षण देण्यात आले. हे अधिकारी आपापल्या विभागात जाऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. देशभरात प्राणी गणना सुरू झाली असून, महाराष्ट्रात लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार आहे. दर चार वर्षांनंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडून (एनटीसीए) ही गणना केली जाते. मागील गणना 2014 मध्ये झाली होती. महाराष्ट्रासह देशभरात दोन टप्प्यांत गणना केली जाणार आहे. प्राण्यांचा अधिवास असलेल्या मर्यादित जांगावर "कॅमेरे ट्रॅपिंग' लावून गणनेचे काम केले जाणार आहे. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. 

सहा दिवस चालणाऱ्या या गणनेत पहिले तीन दिवस मांसभक्षक प्राणी गणना व प्राणीभ्रमण मार्गावर फिरणे तसेच उर्वरित तीन दिवस तृणभक्षक प्राणी नोंदीसाठी दोन ते तीन किलोमीटरच्या ट्रान्झिटवर फिरावे लागणार आहे. यात वाघांच्या पायांचे ठसे, झालेल्या शिकारीचा प्रकार तसेच विष्ठा याचा अभ्यास करून आकडेवारी संकलित केली जाईल. यानंतर सर्व माहिती राज्यनिहाय "एनटीसीए'कडे पाठविली जाईल. 

सद्य-स्थितीला भारतात व्याघ्र प्रकल्पांतर्गत 50 व्याघ्र अभयारण्ये जाहीर करण्यात आली आहेत. यातील महाराष्ट्रातील मेळघाट, पेंच, ताडोबा अंधारी, बोर, नागिझरा नवेगाव, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांत गणना केली जाणार आहे. याशिवाय औरंगाबाद, नाशिक, उपवनसंरक्षक पुणे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही गणना होणार आहे. 

Web Title: nagpur news Wild animals tiger