कर्मचाऱ्यांच्या मोर्चांनी गाजविला दिवस

कर्मचाऱ्यांच्या मोर्चांनी गाजविला दिवस

नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी विविध संघटनांच्या १० मोर्चांनी विधानभवनावर धडक दिली. एकाच दिवशी निघालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाच मोर्चांनी दिवस गाजवला. जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचाऱ्यांनी मुंडण करून महाआक्रोश मोर्चा काढला. अंगणवाडी, ग्रामरोजगार, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह कंत्राटी व असंघटित कर्मचाऱ्यांनीही लक्ष वेधून घेतले.

एकच मिशन-जुनी पेन्शन
शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा महाआक्रोश मुंडण मोर्चा विधानभवनावर धडकला. एकच मिशन-जुनी पेन्शनचा नारा देत मोर्चेकऱ्यांनी लक्ष वेधले.

निर्वाणीचा लढा असल्याचा निर्धार करीत विविध विभागातील कर्मचारी मोर्चात सहभागी झाले  होते. वितेश खांडेकर, मनीषा मडावी, गोविंद उगले, सर्जेराव सुतार, प्रवीण बडे, सुनील दुधे यांच्या नेतृत्वात यशवंत स्टेडियम येथून निघालेल्या मोर्चात कर्मचाऱ्यांनी मुंडण करून  शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. 

‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ लिहिलेल्या टोप्या घालून मोर्चेकऱ्यांनी मागणी रेटली. टेकडी रोड येथे मोर्चा अडविल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी रोष व्यक्त  केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार नाना पटोले यांनी मोर्चास्थळी  जाऊन संघटनेच्या मागण्या व आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

मोर्चेकऱ्यांचा काढता पाय
मोर्चेकरी बराचवेळ तळ ठोकून होते. मात्र, काही काळानंतर एकएक करीत मोर्चेकरी निघून जाऊ लागल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्येही घालमेल सुरू झाली. पुढाऱ्यांनी भावनिक गळ घालीत सहकाऱ्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, वेगवेगळी कारणे देत मोर्चास्थळावरून कर्मचाऱ्यांचा काढता पाय घेण्याचे सत्र सुरूच होते. 

प्रमुख मागण्या
 १९९५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
 २००५ नंतरच्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना निवृत्तिवेतन द्या.
 ऑक्‍टोबर २०१७ च्या शासन निर्णयातील अन्यायकारक अटी रद्द करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com