विधिमंडळाची पर्यावरण समिती स्थापन करणार - रामदास कदम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

नागपूर - पर्यावरणाशी निगडित असलेल्या विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन विधिमंडळाची पर्यावरण समिती दोन महिन्यांत स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधान परिषदेत केली.

नागपूर - पर्यावरणाशी निगडित असलेल्या विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन विधिमंडळाची पर्यावरण समिती दोन महिन्यांत स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधान परिषदेत केली.

हवामान बदल व जागतिक तापमानात वाढ हे विषय २१ व्या शतकात महत्त्वाचे आहेत. या विषयावर अल्पकालीन चर्चा हेमंत टकले यांनी उपस्थित केली. यावर पोटे म्हणाले, दोन्ही सभागृहांतील सदस्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. औद्योगिक क्रांतीमुळे कार्बन व तापमानाचे प्रमाणही वाढले आहे. हरितगृह वायूंमुळे वातावरणातील उष्णता रोखून ठेवली जाते. प्रदूषणामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘टेक ऑफ’ व ‘लॅंडिंग’मध्ये अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. सरकार पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यासाठी प्रयत्न करीत आहे. नद्या आणि नाले साफ करून प्रदूषण व्यवस्थापन करण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे ते म्हणाले. 

निसर्गाचा संहार करण्याची प्रवृत्तीच आता मानवात वाढायला लागली की काय, अशी खंत हेमंत टकले यांनी व्यक्त केली. जंगल आणि जंगलातील प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी आपण काय करणार आहोत. याचा विचार करण्याची वेळ आली आहे. निसर्गाचे लहरीपण आता वाढायला लागले आहे. पर्यावरणाचे बिघडलेले समतोल पुन्हा साधण्यासाठी एकत्रितपणे काम करायला हवं. हवामान बदलाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने वैज्ञानिक पद्धतीने कामाची आखणी करावी. या विषयातल्या संशोधनासाठी मोठी आर्थिक तरतूद करावी. कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट, सांडपाण्यावर प्रक्रिया, नद्यांचं रक्षण, पाणीपातळी वाढवणे आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कार्यक्रम राबविण्याची मागणीही हेमंत टकले, जयंत पाटील व हुस्नबानू खलिफे यांनी केली.

Web Title: Nagpur news Winter Session ramdas kadam environment