महिलांनो, आणखी किती दिवस गुलामगिरीत जगणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून महिलांना समान अधिकार प्रदान केले आहे. मात्र, आजही ते महिलांना मिळालेले नाहीत. भारतीय समाजातील वर्ण, जाती आणि लिंगभेद यास कारणीभूत आहे. महिलांनो, आणखी किती दिवस गुलामगिरीत जगणार, असा सवाल संमेलनाच्या अध्यक्ष नजुबाई गावित यांनी केला.

नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून महिलांना समान अधिकार प्रदान केले आहे. मात्र, आजही ते महिलांना मिळालेले नाहीत. भारतीय समाजातील वर्ण, जाती आणि लिंगभेद यास कारणीभूत आहे. महिलांनो, आणखी किती दिवस गुलामगिरीत जगणार, असा सवाल संमेलनाच्या अध्यक्ष नजुबाई गावित यांनी केला.

लॉर्ड बुद्धा मैत्री संघ, संथागार फाउंडेशन, संबोदिनी महिला बहुउद्देशीय विकास संस्था, राष्ट्रीय पारिवारिक धम्मसंगोष्टी, अनाथपिंडक परिवार, राष्ट्रीय ओ.बी.सी. महासंघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, वंदना संघ दीक्षाभूमी तसेच समस्त महिला संघटनांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय महिला क्रांती परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

महिलांना घरी आणि बाहेरही संघर्ष करावा लागतो. घर चालविण्यासाठी महिलांना दुसऱ्याच्या  घरची धुणीभांडी करावी लागतात. ते करीत असतानाही अपमान सहन करावा लागतो. पुरुषही महिलांना सन्मान करीत नाहीत. स्वतःच्या अधिकारासाठी महिलांनाच आता पुढाकार घ्यावा  लागणार आहे. कितीही अधिवेशन आणि संमेलने घेतली तरी फरक पडणार नाही. अधिकार मागून मिळत नसतील, तर हिसकावे लागतील, असेही नजुबाई गावित म्हणाल्या.

समारोपाला नजुबाई गावित यांच्यासह विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात, आंबेडकरी विचारवंत भय्याजी खैरकर, देवीदास घोडेस्वार आणि एस. एम. जांभुळे होते.  संचालन सरोज आगलावे यांनी केले. पुष्पा बौद्ध यांनी आभार मानले. 

भारतीय संविधानाने महिलांना समान अधिकार प्रदान केले आहे. भारतीय महिलेच्या नात्याने  त्यावर सर्वांचा अधिकार आहे. तो दिला जात नसेल, तर सर्वांनी संघटित होऊन संघर्ष करावा लागेल. संविधानाने महिला व पुरुष असा भेद केला नाही. सर्वांना मानव म्हणून अधिकार दिले आहेत. त्यामुळे जात आणि धर्माच्या पल्याड जाऊन महिलांचा विचार व्हावा.
- देवीदास घोडेस्वार

जोपर्यंत पुरुषांच्या डोक्‍यातून महिला व पुरुष असा भेद जात नाही तोपर्यंत महिलांना समान अधिकार मिळणार नाही. यासाठी आधी पुरुषांची मानसिकता बदलण्याची आवश्‍यकता आहे.  गरीब, दलित आणि महिलांना कधीही समान अधिकार दिले नाही. महिला आणि पुरुषांमधील असमानता, एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन टोकाचे असल्याने संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहे. हेच दोघेही विसरून गेले आहे.
- सुखदेव थोरात

महिलांची एकजूट व संघटनेच्या गोष्टी सर्वच व्यासपीठावरून केल्या जातात. मात्र, त्यावर अंमलबजावणी होत नाही. आजही ती होणार नसेल, तर या अधिवेशनालाही कुठलाच अर्थ राहणार नाही.
- भय्याजी खैरकर

Web Title: nagpur news women Najubai Gavit