नागपूर : नव्या कंत्राटदारांचा पहिल्याच दिवशी 'कचरा'

नागपूर : नव्या कंत्राटदारांचा पहिल्याच दिवशी 'कचरा'

नागपूर : शहरातील कचरा संकलनासाठी महापालिकेने दोन नवीन कंपन्यांची नियुक्ती केली असून आज पहिल्याच दिवशी अनेक भागात कर्मचारीच पोहोचले नसल्याने व्यवस्था कोसळल्याचे चित्र दिसून आले. अनेक गृहिणींना दिवसभर कचरा गाडीची प्रतीक्षा करावी लागली. अनेकांकडे गेल्या दोन-तीन दिवसांपासून कचरा गाडी न पोहोचल्याने घरांमध्येच कचऱ्याला, विशेषतः ओल्या कचऱ्याला दुर्गंधी येत असल्याचे काही नागरिकांनी नमुद केले. एवढेच नव्हे कचरा वर्गीकरणाच्या जनजागृतीसाठीही महापालिकेचे कर्मचारी फिरकले नाही. 

महापालिकेने दहाही झोनपैकी ए. जी. व बीव्हीजी या दोन कंपन्यांना प्रत्येकी पाच झोनमधील घरांमधून कचरा उचल करण्याचे कंत्राट दिले आहे. या नव्या दोन कंपन्यांकडून काल, 15 नोव्हेंबरपासून शहरातील घराघरातून कचरा संकलनाचे काम सुरू करण्यात आले. मात्र, पहिल्या दिवसांपासून दोन्ही कंपन्या चाचपडताना दिसून आल्या. शहराच्या अनेक भागात आज दुसऱ्या दिवशीही कचरा संकलनासाठी कुणीही पोहोचले नाही. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. 'कनक'चा कंत्राट संपुष्टात आल्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तीन-चार दिवसांपासून कामे बंद केली. परिणामी नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात कचरा गोळा झाला. नव्या कंपनीचे कर्मचारी आजपासून नोव्हेंबरपासून येणार असल्याने नागरिकांना त्यांची प्रतीक्षा होती. शहरातील अनेक भागातील नागरिकांनी कचरा गाडीची प्रतीक्षा केली. शहरातील जवाहरनगर, बालाजीनगर, म्हाळगीनगर, महालक्ष्मीनगर, दिघोरी, मानेवाडा, ओंकारनगर, बजरंगनगर, प्रतापनगर, त्रिमूर्तीनगर, जयताळा, नंदनवन, सक्करदरा, मेडिकल परिसर, रेशीमबाग, महाल, सतरंजीपुरा, शांतीनगर, इंदोरा, कमाल टॉकीज परिसर, नारा, नारी, जरीपटका या भागांमधील नागरिकांनीही कचरा गाडी आली नसल्याचे नमुद केले. शहरातील काही भागात यंत्रणा अद्याप सुरू झाली नसल्याचे एका अधिकाऱ्याने नमुद केले. मात्र, काही भागात कचरा गाडी पोहोचल्याचा दावाही या अधिकाऱ्याने केला. 

दरम्यान, आज महापालिकेत आयुक्त अभिजित बांगर यांनी नव्या यंत्रणेची समीक्षा बैठक घेतली. बैठकीत सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधीपक्ष नेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार प्रामुख्याने उपस्थित होते. यंत्रणा नवीन असल्याने सुरूवातीला काम करायला थोडा त्रास जाईल. काही सजग नागरिक कचरा विलग करून देतील. परंतु सर्वच नागरिक कचरा विलग करू देणार नाहीत. याबाबत यंत्रणेमार्फत नागरिकांना जागरुक करणे आवश्‍यक असल्याचे आयुक्तांनी नमुद केले. 

20 तारखेपर्यंतच जनजागृती 
आयुक्त अभिजित बांगर यांनी कचऱ्याचे घरांमध्येच वर्गीकरण करण्यासाठी 20 तारखेपर्यंत नागरिकांना माहिती द्या, त्यानंतर कुठल्याही घरातून कचरा वर्गीकरण नसेल झाले, तो घेऊ नका, असे स्पष्ट निर्देश नव्या कंपन्यांना दिले. त्यामुळे आता महापालिका कर्मचारी साडेसहा लाख घरांपर्यंत तीन दिवसांत कसे पोहोचणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

नागरिकांनी घरातील कचरा हा ओला सुका वर्गीकृत करून द्यावा. 21 तारखेपासून वर्गीकरण झाले नसेल तर कचऱ्याची उचल केली जाणार नाही. नागरिकांनी सहकार्य करावे. 
- अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका. 

गेल्या दोन दिवसांपासून घरात कचरा गोळा झाला आहे. यापूर्वी दोन दिवसांत कचरा गाडी येत होती. त्यामुळे आज कचरा गाडीच्या प्रतीक्षेतच दिवस गेला. 
- सिमा पाटमासे, बालाजीनगर. 

वर्तमानपत्रातून आजपासून नव्या कंपनीचे कर्मचारी कचरा गोळा करण्यासाठी येईल, असे वाचले. त्यामुळे आज तरी घरातील कचरा बाहेर काढता येईल, असे वाटले. परंतु अपेक्षाभंग झाला. 
- वर्षा गुजर, म्हाळगीनगर. 

यापूर्वी कचरा वर्गीकरणाचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, महापालिकेच्या कचरा गाडीमध्येच ही सोय नव्हती. आता सक्ती केल्याने कचऱ्याचे वर्गीकरण केले तर कचरा गाडी आली नाही. 
- भाग्यश्री फुले, पूर्व बालाजीनगर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com