अतिक्रमणावरून भाजप-कॉंग्रेसमध्ये खडाजंगी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

महाल येथील नगरभवनात आज विशेष सभेत अतिक्रमणावर चर्चा करताना लक्ष्मीनगर झोनचे सभापती व भाजप सदस्य प्रकाश भोयर यांनी जयताळा येथील अतिक्रमण कारवाई प्रफुल्ल गुडधे-पाटील यांनी थांबविल्याचा उल्लेख केला.

नागपूर : जयताळा येथील अतिक्रमण कारवाई थांबविल्यावरून कॉंग्रेसचे ज्येष्ठ सदस्य प्रफुल्ल गुडधे-पाटील व माजी महापौर प्रवीण दटके यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे कॉंग्रेसच्या सदस्यांनी महापौरांच्या आसनापुढे जोरदार घोषणाबाज करीत सभात्याग केला. कॉंग्रेसच्या घोषणाबाजीला सत्ताधारी भाजप सदस्यांनीही घोषणाबाजीनेच उत्तर दिल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. अखेर महापौर संदीप जोशी यांना पाच मिनिटांसाठी सभागृह तहकूब करावे लागले. 

महाल येथील नगरभवनात आज विशेष सभेत अतिक्रमणावर चर्चा करताना लक्ष्मीनगर झोनचे सभापती व भाजप सदस्य प्रकाश भोयर यांनी जयताळा येथील अतिक्रमण कारवाई प्रफुल्ल गुडधे-पाटील यांनी थांबविल्याचा उल्लेख केला. यावरून भाजपचे ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी गुडधे यांनी कुठे कारवाई थांबविली? असा प्रश्‍न प्रशासनाला केला. यानंतर प्रफुल्ल गुडधे-पाटील यांनी अतिक्रमण कारवाई का थांबविली, याबाबत स्पष्टीकरण देताना भारतीय फेरीवाला कायद्यानुसार फेरीवाल्यांना संरक्षण असून याबाबत सभापतींना माहिती दिल्याचे सांगितले. यावर ऍड. मेश्राम यांनी या कायद्याचे वाचन करावे, अशी सूचना महापौरांना केली. यावर गुडधे यांनी वाचनासोबतच कायद्याची अंमलबजावणी किती झाली? याबाबतही प्रशासनाने सांगावे, अशी विनंती केली. 

उपायुक्त रंजना लाडे यांनी कायद्याचे वाचन केले. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी न्यायालयाचे यासंदर्भात काही निर्देश आहेत काय? अशी विचारणा केली. आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकृत नॉन हॉकिंग झोन असेल, तर कारवाई शक्‍य असल्याचे न्यायालयाचे म्हणणे असल्याचे सांगितले. यावर माजी महापौर प्रवीण दटके यांनी गुडधे यांनी रोखलेली कारवाई हॉकिंग झोनमधील होती की नॉन हॉकिंग झोनमधील? असा प्रश्‍न केला. यावर प्रफुल्ल गुडधे-पाटील यांनी सभापतींच्या बैठकीचे इतिवृत्त मागवावे, त्यात बेकायदेशीररीत्या कारवाई रोखण्याचे मी म्हटले असेल, तर कायदेशीर कारवाई करा असे आव्हान दिले. यावर दटके यांनी जयताळा रस्त्याचे स्पष्टीकरण द्या, असा आग्रह प्रशासनाकडे धरला. 

हेही वाचा : महापौर म्हणतात, श्‍वेतपत्रिका काढणार 
 

दटके यांच्या आग्रहामुळे गुडधेही आक्रमक झाले. त्यांनीही कायद्याचे पालन न करता अतिक्रमण काढण्याचे ठरविले आहे काय? असा प्रतिप्रश्‍न महापौरांना केला. महापौर संदीप जोशी यांच्या आसनापुढे कॉंग्रेस सदस्यांनी एकत्र येऊन घोषणाबाजी सुरू केली. सत्ताधारी बाकावरील सदस्यांनीही दादागिरी नहीं चलेगीच्या घोषणा दिल्या. यावेळी दटके यांनी अतिक्रमण कारवाई रोखणाऱ्या नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी केली. यावर कॉंग्रेस सदस्यांनी सभात्याग केला. महापौरांनी दोन्ही पक्षांना बसण्याची विनंती केली. परंतु, कॉंग्रेस सदस्य विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अपक्ष नगरसेविका आभा पांडे बाहेर पडले, तर सत्ताधारी नगरसेवकांनी घोषणा दिल्या. 

 

नागरिकांनी साथ द्यावी
अतिक्रमणविरोधात कारवाई करू देणार नाही, असे नमूद करीत कॉंग्रेसने आज ते अतिक्रमणाच्या बाजूने असल्याचे सिद्ध केले. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी चर्चा भरकटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौर संदीप जोशी यांनी कायदेशीररीत्या जो कार्यक्रम आखला त्याला नागरिकांनी साथ द्यावी. प्रकाश भोयर यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रफुल्ल गुडधे-पाटील यांचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला. 
-प्रवीण दटके, माजी महापौर 

सत्ताधाऱ्यांचे मनसुबे आज उघड
सर्वसामान्यांना बेरोजगार करण्याचे सत्ताधाऱ्यांचे मनसुबे आज उघड झाले. सत्ताधाऱ्यांनी उद्यापासून फेरीवाल्यांवर कारवाई करून दाखवावी. बेकायदेशीररीत्या कारवाई करू देणार नाही. सदस्यत्व गेले तरी बेहत्तर, कॉंग्रेस फेरीवाल्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहील. दटके यांच्याच घरापासून कारवाई सुरू करावी. कुठलाही कायदा न पाळता केवळ हुकूमशाहीच्या बळावर काम करण्यात येत आहे. 
-प्रफुल्ल गुडधे-पाटील, कॉंग्रेस सदस्य 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur nmc news about atikraman