नागपूर : पोलिसांना गणवेश भत्त्याची प्रतीक्षा

नागपूर : पोलिसांना गणवेश भत्त्याची प्रतीक्षा

नागपूर : दिवाळीमुळे घरातील आर्थिक स्थिती बिघडली असतानाच दरवर्षीप्रमाणे मिळणारा गणवेश भत्ता रखडला आहे. त्यामुळे पोलिस कर्मचारी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. गणवेश भत्त्याचे पाच हजार खात्यात कधी जमा होतात, याची ते वाट पाहत असल्याची माहिती आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी गणवेश (वर्दी) भत्ता गृहमंत्रालयाने मंजूर करण्यात आला आहे. जवळपास 5 हजार 200 रुपये प्रत्येक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यापूर्वी पोलिस खात्याकडून खाकी रंगाचा कापड, बूट, मोजे, लाठी, शिट्‌टी, अँकलेट, सारंजाम, दरी, पीटी शूज आणि पोलिस बॅग हे सर्व साहित्य देण्यात येत होते. मात्र, या साहित्य निकृष्ट दर्जाचे होते. ते वेळेवरही उपलब्ध होत नव्हते. या सर्व प्रकाराला पोलिस कर्मचारी कंटाळले होते. या प्रकाराची गृहमंत्रालयाने गांभीर्याने दखल घेतली. पोलिस साहित्याचा कुण्या खासगी कंपनीला ठेका देण्याऐवजी पोलिस कर्मचाऱ्यांच्या थेट बॅंक खात्यात 5 हजार 200 रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही वर्षांपासून वर्दी भत्ता म्हणून पोलिस कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे येतही होते. मात्र, यावर्षी गृहमंत्रालयात वर्दीभत्त्याचे घोडे अडले. एकाही पोलिस कर्मचाऱ्याला वर्दीभत्ता मिळाला नाही. त्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून खाकी कापडे आणि शूज घेतले. तर अनेकांनी जुन्याच वर्दीला नाइलाजाने पसंती दिली आहे. वर्दीभत्ता न मिळाल्यामुळे महिन्याच्या बजेटमधूनच पैसे खर्च करावे लागणार असून गृहिणींचे आर्थिक बजेट बिघडले असल्याची चर्चा आहे. दिवाळी सणाचा खर्च आणि आता पुन्हा पोलिस कर्मचाऱ्याला पाच हजारांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागपूर पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

अधिकाऱ्यांना 20 हजार 
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पोलिस सेवा गणवेश नियम 1954 नुसार भारतीय सेवेतील पोलिस अधिकाऱ्यांना (आयपीएस दर्जाच्या पोलिस अधिकारी) वर्दीभत्ता म्हणून दरवर्षी 14 हजार रुपये केंद्र शासनाकडून देण्यात येत होते. मात्र, त्यामध्ये 2017 मध्ये सुधारणा करण्यात आली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com