शहरात तोतया पोलिसांचा हैदोस

File photo
File photo

नागपूर, ता. 6 ः शहरात तोतया पोलिसांनी हैदोस घातला असून केवळ दीड तासांत चौघांना लुटून लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटना बुधवारी सकाळी 11 ते 11ः30 वाजतादरम्यान अजनी, बेलतरोडी, प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. या प्रकारामुळे पोलिसांसमोर तोतया पोलिसांचे नवे आव्हान उभे झाले आहे. तसेच स्थानिक पोलिसांच्या गस्त प्रणालीवरही संशय निर्माण झाला आहे.
घटना पहिली....
मधुकर ओमकार काळे (वय 67, दुबे ले-आउट) यांनी बुधवारी सकाळी अकरा वाजता जयताळा रोडवरील पंजाब नॅशनल बॅंकेतून पैसे काढून पायी घरी जात होते. अग्नी ले-आउटसमोर 35 वर्षे वयोगटातील दोन तोतया पोलिसांनी अडविले. चेकिंग सुरू असल्याचे सांगत सोनसाखळी, अंगठी आणि नगदी 7 हजार रुपये असा 53 हजारांचा ऐवज रुमालात बांधून ठेवायचा सांगितला. तो ऐवज तोतया पोलिसांनी हिसकावून पळ काढला. प्रतापनगर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
घटना दुसरी...
संजय दत्तात्रय गुंडावार (वय 65, रा. श्‍यामनगर) हे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता नातवाला शाळेतून आणण्यासाठी दुचाकीने जात होते. मनीषनगर रोडवर ते चहाटपरीवर चहा घेत होते. दरम्यान, तीन तोतया पोलिसांनी त्यांना समोर बोलावले. त्यांनी शहरात तपासणी सुरू असल्याचे सांगून बोटातील दोन अंगठ्या आणि सोनसाखळी काढून रुमालात बांधायला सांगितले. बांधण्यास मदत करण्याच्या नावाखाली दागिन्यांचा रुमाल लंपास केला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
घटना तिसरी...
गिरिधर महादेवराव पराते (वय 61, रा. बेलतरोडी रोड) हे बुधवारी पावणे बारा वाजता देवदर्शनासाठी जात होते. सप्तगिरी नगरात तीन तोतया पोलिसांनी त्यांना अडविले. सोनसाखळी, अंगठी काढून रुमालात बांधायला लावली. 55 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून तिघांनीही पळ काढला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
घटना चौथी
पुरुषोत्तम डोमाजी मून (वय 68, रा. नालंदानगर) हे बुधवारी दुपारी सव्वा बारा वाजता मित्राच्या घरून स्वतःच्या घरी जात होते. आंबेडकर नगर टी पॉइंटजवळ दुचाकीने दोन तोतया पोलिस आले. "तुमच्याकडे गांजा आहे, त्यामुळे झडती घ्यावी लागेल,' अशी बतावणी केली. त्यांनी गळ्यातील सोनसाखळी आणि अंगठी असा एकूण 36 हजार रुपयांचा ऐवज काढण्यास सांगितले. रुमालात बांधत असताना पळ काढला. अजनी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
वाहतूक पोलिसांचे अस्त्र
तोतया पोलिसांचा शहरात नेहमीच सुळसुळाट असतो. अनेक वेळा पोलिस मित्र आणि वाहतूक पोलिस मदतनीस (एटीपी) हे पोलिस कर्मचाऱ्यांकडून तंत्र शिकून घेतात. लाचेची रक्‍कम थेट स्वीकारावी लागत असल्यामुळे कुणीतरी खात्याबाहेरील युवक सोबत ठेवतात. त्याला पोलिस मित्र-एटीपी असल्याचे सांगतात. लाच घेताना पकडले जाऊ नये म्हणून, वाहतूक पोलिस असे युवक ठेवत असतात. मात्र, तेच युवक भविष्यात लुटमार करू शकतात. त्यामुळे पोलिस आयुक्‍तांनी या बाबींकडे लक्ष द्यायला हवे.
..
पोलिस मित्रांची चौकशी व्हावी
शहरात हजारोंवर पोलिस मित्र (?) आहेत. वर्षांनुवर्षे तेच ते युवक पोलिस मित्र म्हणून मिरवतात. स्थानिक ठाण्यातील पोलिसांचा आर्थिक व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी काही पोलिस मित्रांवर असते. तसेच काही पोलिस मित्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून ते जुगारअड्‌डा, वरली-मटका, क्रिकेट सट्‌टेबाजांकडून पैसे वसुलीची कामे करतात. ते नेहमी पोलिस कर्मचाऱ्यांसोबत राहत असल्याने पोलिसांची भाषाशैली, खाकी रंगाचा पॅंट, ब्लॅक शूज आणि केशरचना करतात. त्यामुळे ते साध्या वेशातील पोलिस भासवून लूटमार करतात, त्यामुळे पोलिस मित्रांची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com