मंत्रालय उंदीरमुक्त; रेल्वेस्थानक कधी होणार? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नागपूर - मंत्रालयातील उंदरांची समस्या मोजक्‍या दिवसांमध्येच मार्गी लागली. मात्र, वारेमाप प्रयत्न करूनही नागपूर रेल्वेस्थानकावरील उंदरांचा बंदोबस्त करणे शक्‍य होऊ शकले नाही. ही समस्या सोडविण्यासाठी विशिष्ट विषारी पदार्थाचा उपयोग केला जातो. त्याद्वारे दरमहा सुमारे 200 उंदीर मारले जात असले तरी त्यांची जागा नवीन उंदीर घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. 

नागपूर - मंत्रालयातील उंदरांची समस्या मोजक्‍या दिवसांमध्येच मार्गी लागली. मात्र, वारेमाप प्रयत्न करूनही नागपूर रेल्वेस्थानकावरील उंदरांचा बंदोबस्त करणे शक्‍य होऊ शकले नाही. ही समस्या सोडविण्यासाठी विशिष्ट विषारी पदार्थाचा उपयोग केला जातो. त्याद्वारे दरमहा सुमारे 200 उंदीर मारले जात असले तरी त्यांची जागा नवीन उंदीर घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. 

अनेक निराश्रितांप्रमाणेच नागपूर रेल्वेस्थानक उंदरांचेही हक्काचे निवासस्थान ठरले आहे. रेल्वेस्थानकाच्या फलाटाखाली उंदरांची अख्खी वसाहत आहे. खाण्यापिण्याची चंगळ असल्याने उंदीर चांगलेच गडेलठ्ठ झाले असून, त्यांचा आकार सर्वसामान्यांना घाबरगुंडी उडविणारा ठरला आहे. दिवसा हे उंदीर फारसे बाहेर फिरकत नसले तरी सायंकाळ होताच झुंडीने सर्वत्र मुक्तसंचार सुरू होतो. प्रवाशांची संख्या असतानासुद्धा न घाबरता उंदरांच्या वरातीची इकडून तिकडे भ्रमंती सुरू आसते. इथवर सर्व ठीक आहे; पण थेट रुळाखालील जागा पोखरत असल्याने रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

उंदरांच्या बंदोबस्तासाठी चंदीगढ कृषी विद्यापीठाने तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पथक पाठविण्याचा निश्‍चयही झाला होता. परंतु, माशी कुठे शिंकली सांगता येणे कठीण आहे. परंतु, प्रशिक्षण दौरा रद्द झाला. इकडे उंदरांची संख्या वाढत राहिली. आता सफाईचे कंत्राट असलेल्या व्यक्तीलाच उंदरांच्या संख्येवर नियंत्रणासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली आहे. 

कंत्राटदाराने खास तेवढ्यापुरतीच एका व्यक्तीची कायमस्वरूपी नियुक्ती केली आहे.

विशिष्ट द्रव्यांचे मिश्रण करून ते उंदरांचा वावर अधिक असलेल्या ठिकाणी ठेवले जाते. आठवड्यातून दोन दिवस हा प्रयोग केला जातो. त्यातून दर आठवड्याला सरासरी 50 म्हणजेच महिन्याकाठी उंदरांची संख्या सुमारे 200ने कमी होत आहे. परंतु, तेवढेच उंदीर नव्याने तयार होतात. अशास्थितीत उंदरांच्या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कोणता उपाय करावा, हा प्रश्‍न प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. मंत्रालयातील लाखो उंदीर मोजक्‍याच दिवसात नष्ट करणारा कंत्राटदारच नागपूर रेल्वेस्थानकाचा प्रश्‍न निकाली काढू शकतो, इतर कुणाचीही बिशाद नाही, हा विनोद कर्मचाऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

Web Title: nagpur railway station when free rat