नागपूर @ ४६.४

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भावर सूर्याचा प्रकोप सुरूच आहे. शहरात दिवसभर उन्हाचे तीव्र चटके जाणवले. सायंकाळी काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला ऊन-पावसाचा खेळ आणखी काही दिवस कायम राहणार आहे.

नागपूर - मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भावर सूर्याचा प्रकोप सुरूच आहे. शहरात दिवसभर उन्हाचे तीव्र चटके जाणवले. सायंकाळी काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला ऊन-पावसाचा खेळ आणखी काही दिवस कायम राहणार आहे. 

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टचा सर्वाधिक फटका मंगळवारी नागपूरकरांना बसला. येथे विदर्भासह संपूर्ण राज्यात सर्वाधिक ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. ब्रह्मपुरी व वर्धा येथे पारा ४५.८ अंशांवर, तर अकोला व यवतमाळ येथे ४५.० अंश सेल्सिअसवर गेला. शहरात दुपारी उन्हाचे चटके व उकाडा जाणवल्यानंतर सायंकाळी अचानक वातावरण बदलले. 

सायंकाळच्या सुमारास पूर्व नागपुरातील अनेक भागांत हलक्‍या सरी कोसळल्या. शहरात इतरही ठिकाणी शिडकावा झाला. विदर्भात आणखी दोन-तीन दिवस उष्णलाट राहणार असली तरी, ‘लोकल डेव्हलपमेंट’मुळे सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी पाऊसही येण्याची शक्‍यता आहे.

मॉन्सून ७२ तासांत केरळात?
अरबी समुद्रातील दक्षिण प्रायद्वीपमध्ये बुधवारी जोरदार पावसासाठी आवश्‍यक असलेला कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची दाट शक्‍यता आहे. त्याच्या प्रभावामुळे पुढील ७२ तासांत मॉन्सूनच्या आगमनाला अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे. परिणामत: येत्या सहा किंवा सात जूनला केरळमध्ये मॉन्सून धडकण्याची शक्‍यता आहे. मॉन्सूनची प्रगती समाधानकारक राहिल्यास विदर्भात १५ जूननंतर आगमन अपेक्षित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Temperature @ 46.4 Degree Summer heat