उष्माघाताने चौघांचा मृत्यू

file photo
file photo

नागपूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाच्या तडाख्याने त्रस्त असलेल्या वैदर्भींचा ताप आणखी वाढला असून नागपूरचा पारा 45.3 अंशावर गेला आहे. त्यामुळे नागपूरकरांना दिवसभर चटके सहन करावे लागत असून उष्माघाताने चार जणांचा बळी घेतला. त्यामुळे बस करा सूर्यदेवा अशी म्हणण्याची पाळी नागरिकांवर ओढावली
नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे ज्ञानेश्‍वर बाजीराव पेंदाम (वय 60, रा. दिघोरी उड्डाणपुलाजवळ, आदिवासी ले-आउट) यांचा मृतदेह शनिवारी (ता. 27) सकाळी आठ वाजताच्या सुमारास आढळून आला. याशिवाय संघर्षनगर झोपडपट्टी परिसरात 50 ते 55 वयोगटातील एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. इतवारी रेल्वे स्टेशनजवळील दक्षिण गेटच्या आत 35 ते 40 वयोगटातील एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आला. कळमना भागात अंदाजे 40 वर्षांचा भय्या नावाचा व्यक्ती लकडगंज येथील साई ट्रेडर्ससमोरील ट्रकच्या ट्रॉलीत मृत अवस्थेत आढळला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
राजस्थानकडून येणाऱ्या तीव्र लाटेमुळे विदर्भासह महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अक्षरश: होरपळून निघतो आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाची प्रचंड लाट पसरली आहे. उन्हाचा सर्वाधिक फटका अकोलेकरांना बसतो आहे. येथे सलग तिसऱ्या दिवशी पारा देशात दुसऱ्या क्रमांकावर राहिला. शनिवारीही कमाल तापमानात वाढ होऊन पारा 46.4 अंशांवर गेला. हवामान विभागाने विदर्भात येत्या मंगळवारपर्यंत तीव्र उष्णलाटेचा इशारा दिला आहे. विशेषत: नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये लाटेचा सर्वाधिक प्रभाव राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुपारी जणू अघोषित संचारबंदी
नागपुरात गेल्या चोवीस तासांत आणखी एका अंशाची वाढ होऊन पारा या मोसमातील उच्चांकी 45.3 अंशांवर पोहोचला. उन्हामुळे शहरात प्रचंड उकाडा जाणवला. अंगातून घामाच्या धारा वाहिल्या. दुपारच्या सुमारास जणू अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र शहरात सर्वत्र पाहायला मिळाले. उन्हाच्या तडाख्यापुढे पंखे व कुलर्सदेखील प्रभावहीन ठरत आहेत. उन्हाच्या झळा सायंकाळी व उशिरा रात्रीपर्यंत जाणवत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com