वाहतूक नियम मोडण्यात नागपूर अव्वल

अनिल कांबळे
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

नागपूर : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या यादीत नागपूर शहराचा राज्यात प्रथम क्रमांक लागतो. शहरातील कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्थेचेही तीनतेरा वाजले आहेत. नागपुरात वाहनचालकांना शिस्त लागावी किंवा वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी पोलिस आयुक्‍तांसह वाहतूक शाखेचे उपायुक्‍त प्रयत्न करीत आहेत. मात्र, राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार शहरांचा विचार केल्यास वाहतूक नियम पाळणाऱ्यांची संख्या नागपुरात सर्वांत कमी आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक शाखेला कायमस्वरूपी पोलिस उपायुक्‍त मिळाले नव्हते. त्यामुळे वाहतुकीचे नियंत्रण आणि सुव्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यात आले नाही. परिणामी, शहरातील वाहतूक ताळ्यावर नव्हती. शहरात मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यासाठी रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे, तर कुठे "वन-वे ट्रॅफिक' करण्यात आली आहे. यामुळे अनेकदा शहरात मोठमोठे जॅम लागतात. शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडल्यामुळे सामान्य नागरिकही त्रस्त आहे. वाहतूक पोलिसांचे कमाईवर लक्ष आहे. कारवाई कमी आणि वसुलीच जास्त करीत असल्यामुळे वाहनचालकही वाहतुकीचे नियम मोडत आहेत. "शंभरी' दाखविल्याबरोबर वाहतूक पोलिस वाहनचालकास सोडून देतात, ही वस्तुस्थिती असल्यामुळे वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत जानेवारी ते जुलैपर्यंत 2 लाख 79 हजार 127 वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी चालान कारवाई केली आहे. वाहनचालकांकडून नागपूर वाहतूक पोलिसांनी 4 कोटी 88 लाख 36 हजार रुपयांचा घसघशीत दंडही वसूल केला आहे.
वाहतुकीचे नियम मोडण्याच्या प्रकारात सर्वाधिक सिग्नल जम्पिंग, ट्रीपल सीट, ड्रायव्हिंग लायसन नसताना वाहन चालविणे, हेल्मेट न घालता वाहन चालविणे, नो पार्किंगमध्ये वाहन लावणे, सीटबेल्ट न वापरणे, दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे आणि रॉंग साइड वाहन चालविण्याचा समावेश आहे.

वाहतूकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी पोलिस प्रयत्नरत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, वाहतूक व्यवस्था बिघडू नये म्हणून विविध अभियान राबविण्यात येत असतात. नियम पाळा आणि दंड टाळा, हा मंत्र नागरिकांनी कायम लक्षात ठेवायला हवा.
-चिन्मय पंडित (पोलिस उपायुक्‍त, वाहतूक शाखा)

अनेकदा वर्दीधारक आणि वाहतूक पोलिसच वाहतूक नियमांचे पालन करताना दिसत नाही. सिग्नलवर वाहनचालक थांबलेले असताना मागून आलेला पोलिस कर्मचारी सिग्नल जम्प करून निघून जातो. त्यामुळे वाहतूकीचे नियम फक्‍त सामान्यांसाठीच आहेत का? असा प्रश्‍न निर्माण होतो.
- सूरज दहिकर (विद्यार्थी)

वाहतूक पोलिसांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था ताळ्यावर येऊ शकते. मात्र, दंडाची पावती फाडण्यापेक्षा स्वतःसाठी वसुली करण्यात वाहतूक पोलिसांना जास्त रस आहे. ही प्रवृत्ती बदल्यास वाहनचालकांची वृत्ती बदलेल.
- ऍड. सविता जाधव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur tops in breaking traffic rules