बेरोजगार प्राध्यापक कंत्राटी कामासाठी उत्सुक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विभाग आणि संलग्नित तीन महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकाच्या 92 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली. जाहिरातीला बेरोजगार प्राध्यापकांकडून बराच प्रतिसाद मिळाला असून, सातशेहून अधिक अर्ज आल्याची माहिती आहे.

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विभाग आणि संलग्नित तीन महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकाच्या 92 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली. जाहिरातीला बेरोजगार प्राध्यापकांकडून बराच प्रतिसाद मिळाला असून, सातशेहून अधिक अर्ज आल्याची माहिती आहे.
विद्यापीठात पस्तीसहून अधिक विभाग व तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. यापैकी बऱ्याच विभागांमध्ये तासिका तत्वावर कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. महत्त्वाचे म्हणजे बऱ्याच विभागांमध्ये दहा ते पंधरा प्राध्यापक कंत्राटी म्हणून काम करताना दिसून येतात. एलआयटी, बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय आणि बॅरि. एस. के. वानखेडे शिक्षण महाविद्यालयात सर्वाधिक कंत्राटी प्राध्यापकांचा समावेश आहे. सेमिस्टर पद्धतीने दोन सत्रासाठी प्राध्यापकांना नियुक्त करण्यात येते. या प्राध्यापकांना तासिकाप्रमाणेच वेतनही दिले जाते. मात्र, तासिका संपताच प्राध्यापक निघून जातात. बरेचदा विद्यार्थी क्‍लासमध्ये दिसून येत नसल्याने या प्राध्यापकांच्या तासिका वाया जाते.
आता या प्राध्यापकांना "फुलटाईम' वर्कलोड देत सहायक प्राध्यापकांचा दर्जा देण्यात येणार आहे. यासाठी त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याला 24 हजार रुपये "फिक्‍स पे' देण्यात येणार आहे. 30 जुलैला संकेतस्तळावर आरक्षणनिहाय रिक्त जागांची माहिती दिली. संकेतस्थळावर अर्जाचा नमुना देत उमेदवाराला नऊ कॉपीत 16 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करायचा होता. आलेल्या सातशेहून अधिक अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल.
250 पेक्षा अधिक जागा रिक्त
राज्य सरकारने पदभरती प्रक्रिया बंद केल्याने थेट परिणाम विद्यापीठासारख्या संस्थांवर झाल्याचे चित्र दिसून येते. विशेष म्हणजे विद्यापीठाला पुढल्यावर्षी "नॅक' मूल्यांकनासाठी समोर जायचे आहे. मात्र, त्यासाठी रिक्त जागा सर्वात मोठा अडसर असताना विद्यापीठात प्राध्यापकांचे 250 पेक्षा अधिक पद रिक्त आहेत.

Web Title: nagpur university news