विद्यापीठात अभाविपच्या कार्यकर्त्यांची गुंडागर्दी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

नागपूर : निकाल वेळेवर लावावा तसेच विविध विषयांवरील मागण्यांचे निवेदन देण्यासाठी नागपूर विद्यापीठात गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी अक्षरशः धुडगूस घातला. "लोखंडी चॅनेलगेट' तोडले, तसेच कुलसचिवांच्या काचाही फोडल्या. ही घटना शुक्रवारी (ता.8) दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात घडली. यावेळी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरात नेमण्यात आलेल्या पुरुष आणि सुरक्षारक्षकांसोबत धक्काबुक्कीही केली. त्यात दोन सुरक्षारक्षक जखमी झाले.

नागपूर : निकाल वेळेवर लावावा तसेच विविध विषयांवरील मागण्यांचे निवेदन देण्यासाठी नागपूर विद्यापीठात गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी अक्षरशः धुडगूस घातला. "लोखंडी चॅनेलगेट' तोडले, तसेच कुलसचिवांच्या काचाही फोडल्या. ही घटना शुक्रवारी (ता.8) दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात घडली. यावेळी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरात नेमण्यात आलेल्या पुरुष आणि सुरक्षारक्षकांसोबत धक्काबुक्कीही केली. त्यात दोन सुरक्षारक्षक जखमी झाले.
बी.कॉमच्या पहिल्या सेमिस्टरचा निकाल संकेतस्थळावर दिसत नसल्यामुळे अभाविपचे महानगरमंत्री वैभव बावनकुळे यांच्या नेतृत्वात दहा ते पंधरा पदाधिकारी विद्यापीठात धडकले. त्यांनी कुलगुरूंना भेटण्याची विनंती केली. मात्र, कुलगुरूंनी केवळ चार पदाधिकारी येतील असे सांगितले. मात्र, पदाधिकाऱ्यांनी यास विरोध केला आणि धुडगूस घालण्यास सुरुवात केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्र-कुलगुरूच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या चॅनेलगेट तोडले. यावेळी तिथे असलेल्या महिला सुरक्षारक्षकांनी त्यांना मज्जाव केला असता, त्यांनाही धक्काबुक्की केली. याशिवाय मागच्या बाजूने कुलसचिव कार्यालयात शिरून तेथील दरवाजाच्या काचा फोडल्या. यानंतर सभागृहात येऊन घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे बाहेरच्या गेटही तोडून फेकत असताना, योगेश गांगुर्डे आणि राहुल रेहतवार या सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केली. तोडलेले गेट योगेशच्या अंगावर पडल्याने तो जखमी झाला. यानंतर काहीच वेळात व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे, सिनेट सदस्य वामन तुर्के यांनी मध्यस्थी करून कुलसचिव डॉ. नीरज खटी यांना निवेदन दिले. त्यावर प्रशासनाने संपूर्ण मागण्या मान्य केल्यात. दरम्यान, निवेदन देण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही सुरक्षारक्षकाशी धक्काबुक्की केलेली नसल्याचे स्पष्टीकरण अभाविपकडून देण्यात आले आहे.
धक्‍काबुक्कीचा विरोध करण्यास मनाई
विद्यापीठाच्या परिसरात कुठलाही अनुचित प्रकार वा विद्यार्थी संघटनांकडून तोडफोडीची घटना होऊ नये यासाठी लाखो रुपये खर्चुन पोलिस सुरक्षा बल तैनात करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या मुख्यप्रवेशद्वारापासून तर कुलगुरूंच्या कक्षापर्यंत हे सुरक्षारक्षक तैनात असतात. अशा कारवायांना बंधन घालण्यासाठीच त्यांनी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतरही अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना धक्काबुक्की होत असताना, प्रतिकार करू नका असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यामुळे अभाविपच्या गुंडागर्दीची मूक संमती विद्यापीठ प्रशासनाने दिली असल्याचे निदर्शनास आले.
अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव!
विद्यापीठात अभाविपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या तोडफोडीनंतर पोलिसांना पाचारण करुन त्याची माहिती देणे अनिवार्य होते. मात्र, यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्रभारी कुलसचिव यांचेसह अधिकारी मुख्य कार्यालयातून गायब झालेत. त्यांना संपर्क केला असता, त्यांनी व्यस्त असल्याचे कळविले. डॉ. खटी यांनी कारवाई करु असे सांगून अधिक बोलण्यास टाळले. एकूणच विद्यापीठ प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात तोडफोड केल्यानंतर त्यांच्यावरही राजकीय दबावापोटी कारवाई झाली नव्हती हे विशेष.

Web Title: nagpur university news