नागपूरकर ‘योग’मग्न!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

नागपूर - पहाटे साडेपाचपासून हजारोंच्या संख्येने लोक धंतोलीतील यशवंत स्टेडियमच्या दिशेने वळत होते. साडेसहापर्यंत स्टेडियमवर मोठी गर्दी झाली आणि हजारोंच्या संख्येने आलेल्या लोकांनी सामूहिक योगासनांचे प्रात्यक्षिक केले. सलग तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नागपूर - पहाटे साडेपाचपासून हजारोंच्या संख्येने लोक धंतोलीतील यशवंत स्टेडियमच्या दिशेने वळत होते. साडेसहापर्यंत स्टेडियमवर मोठी गर्दी झाली आणि हजारोंच्या संख्येने आलेल्या लोकांनी सामूहिक योगासनांचे प्रात्यक्षिक केले. सलग तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह रामभाऊ खांडवे, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार गिरीश व्यास, आमदार सुधाकर देशमुख, सत्तापक्षनेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, विभागीय आयुक्त अनुपकुमार, महापालिका आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांची प्रमुख उपस्थिती होती. नितीन गडकरी यांनी स्वच्छता राखण्याची शपथ नागरिकांना दिली. नागपूर महापालिका, जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, आर्ट ऑफ लिव्हिंग, गायत्री परिवार, मैत्री परिवार, क्रीडा भारती, श्रीरामचंद्र मिशन, सहजयोग ध्यान केंद्र, ब्रह्मकुमारी, एनसीसी, नागपूर जिल्हा योग असोसिएशन, जिल्हा क्रीडा असोसिएशन यांच्या वतीने यशवंत स्टेडियमवर सामूहिक योगासनांचे आयोजन करण्यात आले. शिक्षणासाठी नागपुरात वास्तव्यास असलेल्या विदेशी तरुणींनीही योगासने केली. विशेष म्हणजे शहराच्या काही भागांमध्ये रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली होती. पण, यशवंत स्टेडियमच्या भागात हलक्‍या सरी आल्याने फरक पडला नाही. मात्र पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन स्टेडियमच्या मध्यभागी मॅट टाकण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांसह तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले. तज्ज्ञांनी व्यासपीठावरून दिलेल्या सूचनांनुसार सर्वांनी आसने, तसेच सूर्यनमस्कार केले. पांढरा कुर्ता आणि पायजमा व त्यावर भगवा दुपट्टा असा ड्रेसकोड ठरलेला असावा, असेच स्टेडियमवरील दृश्‍य बघून वाटत होते. नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

विदेशी तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग
पहाटेपासून यशवंत स्टेडियमवर गर्दी 
नितीन गडकरी, महापौरांनीही केली आसने

रेशीमबाग, सिव्हिल लाइन्स, मानकापुरातही सामूहिक योगासने

जिल्ह्यातील विविध गावांत योगासने शालेय विद्यार्थ्यांना सांगितले महत्त्व

भारताबाहेर चीन-पाकिस्तानसह सर्वच देशांमध्ये आज योगदिन साजरा होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. शाळांमध्ये तसेच उद्यानांमध्ये नियमित योगासने केल्यास प्रचार-प्रसार होईल व शहरातील नागरिक निरोगी आयुष्य जगू शकतील.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री 

Web Title: nagpur vidarbha global yoga day