सुपरचे लिथोट्रेप्सी यंत्र कालबाह्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

आठ महिन्‍यांपासून बंद - उपचाराशिवाय परततात किडनी स्‍टोनचे रुग्‍ण

नागपूर - किडनी स्टोन रुग्णांसाठी वरदान ठरणारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ‘लिथोट्रेप्सी’ मशीन कालबाह्य झाली. यामुळे लिथोट्रेप्सीवरील उपचार थांबले आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचाराशिवाय परतावे लागते.  

आठ महिन्‍यांपासून बंद - उपचाराशिवाय परततात किडनी स्‍टोनचे रुग्‍ण

नागपूर - किडनी स्टोन रुग्णांसाठी वरदान ठरणारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ‘लिथोट्रेप्सी’ मशीन कालबाह्य झाली. यामुळे लिथोट्रेप्सीवरील उपचार थांबले आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचाराशिवाय परतावे लागते.  

किडनी स्टोनच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने सहा वर्षांपूर्वी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील नेफ्रॉलॉजी विभागाला लिथोट्रेप्सी उपकरण दिले होते. सुपरच्या नेफ्रॉलॉजी विभागात आठवड्यातून दोन दिवस किडनी स्टोन असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. या दोन दिवसांत शंभरावर रुग्णांवर नियमित उपचार होतात. अशा रुग्णांना अद्ययावत उपकरणाचा आधार घेऊन शॉक दिला जातो. खड्याला मिळालेल्या शॉकमुळे खडे विरघळून लघवीवाटे बाहेर पडतात. 

अंदाजे एक कोटी ५५ लाख रुपये खर्चून हे यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, आठ महिन्यांपूर्वी हे उपकरण बंद झाले. 

तांत्रिक बिघाड झाल्याने सुपर प्रशासनाने सात लाख रुपये खर्चून ते दुरुस्त करून घेतले. दरवर्षी १० हजार शॉक देण्याची क्षमता असलेल्या या उपकरणाने आतापर्यंत १८ हजार रुग्णांना शॉक देऊन झाले आहेत. त्यामुळे त्याने कालमर्यादा आधीच ओलांडली असताना त्यात पुन्हा तांत्रिक बिघाड निर्माण झाला.

नवीन लिथोट्रेप्सीचा प्रस्ताव थंडबस्त्यात 
सुपरमधील सदर उपकरण कालबाह्य झाले आहे. हे यंत्र दुरुस्त करून घेणे परवडणारे नाही. त्यामुळे नवे उपकरण देण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्रालयाला सादर केला. त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. हा प्रस्ताव थंडबस्त्यात असल्याची माहिती विदर्भ आरोग्य वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी संघटनेतर्फे मिळाली.

किडनीस्टोन असलेल्या रुग्णांना वेदनामुक्तीसाठी लिथोट्रेप्सी यंत्र मिळाले. परंतु, हे यंत्र कालबाह्य झाले आहे. यंत्र सुरू असल्याचा देखावा येथे केला जातो. गरिबांना हजार रुपयांत ही सुविधा मिळत होती. ती बंद पडल्याने रुग्णांना खासगीचा रस्ता धरावा लागतो. गरिबांच्या वेदनांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. 
- त्रिशरण सहारे, अध्यक्ष, विदर्भ आरोग्य वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी संघटना, नागपूर.

Web Title: nagpur vidarbha lithotrepsy machine expired