स्थळामुळे बदलतील निवडणुकीची समीकरणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

नागपूर - आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ बदलल्यामुळे संमेलनाध्यक्ष निवडणुकीची समीकरणेदेखील बदलणार आहेत. सध्या या निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे चार उमेदवार निश्‍चित असले तरी येत्या काही दिवसांत आणखी काही नावे पुढे येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

नागपूर - आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ बदलल्यामुळे संमेलनाध्यक्ष निवडणुकीची समीकरणेदेखील बदलणार आहेत. सध्या या निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे चार उमेदवार निश्‍चित असले तरी येत्या काही दिवसांत आणखी काही नावे पुढे येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हिवरा आश्रम येथे जाहीर झाले होते. पण, स्थळावरून उठलेल्या वादळाने आयोजकांनी माघार घेतली आणि सारेच चित्र बदलले. मुख्य म्हणजे दिल्लीला संमेलन होण्याची चिन्हे असताना  बरीच नावे या शर्यतीत होती. दिल्लीने प्रस्ताव मागे घेतल्यामुळे काही साहित्यिकांनी शांतपणे एक पाऊल मागे घेतले. 

या संपूर्ण कालावधीत मराठवाड्यातील शाखेने संमेलनस्थळ म्हणून बडोदा आणि संमेलनाध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्यासाठी आग्रह धरला होता. त्याचदरम्यान बिनविरोध निवड होणार असेल तरच पुढे येण्याची भूमिका न्या. चपळगावकर यांनी मांडली. पण, हिवरा आश्रमची यजमानपदासाठी घोषणा झाली आणि न्या. चपळगावकर यांच्या नावाची चर्चा थांबली. पुढे संमेलस्थळावरून वाद उद्‌भवला आणि हिवरा आश्रमनेही माघार घेतली. 

आता केवळ बडोद्याचा पर्याय महामंडळापुढे शिल्लक आहे. घोषणा झालेली नसली, तरी बडोद्याच्या बाजूनेच पारडे झुकते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा न्या. चपळगावकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. डॉ. किशोर सानप आणि डॉ. रवींद्र शोभणे यांनी कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. 

राजन खान यांनी न्या. चपळगावकर यांच्यासाठी माघार घेण्याची तयारी दर्शविली. तर, रवींद्र गुर्जर सध्या तरी निवडणुकीसाठी सज्ज आहेत. त्यामुळे सध्या तरी विदर्भ विरुद्ध पश्‍चिम महाराष्ट्र असे चित्र आहे. 

अशा परिस्थितीत चपळगावकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तरच निवडणुकीत रंगत असेल, अन्यथा एकतर्फी झाल्यास आश्‍चर्य नसेल. 

बडोद्याने पाठविले महामंडळाला पत्र
संमेलनस्थळाबाबत निर्णय घेण्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष सध्या कार्यकारिणीतील सदस्यांसोबत सल्लामसलत करीत आहेत. येत्या एक-दोन दिवसांमध्ये यावर निर्णय होण्याचीही शक्‍यता आहे. दरम्यान, आयोजनासाठी आपली तयारी असल्याचे अधिकृत पत्र बडोदा येथील मराठी वाङ्‌मय परिषदेने महामंडळाला पाठविल्याचे कळते.

Web Title: nagpur vidarbha news akhil bhartiy marathi sahitya sammelan