अमित शहा यांची सरसंघचालकांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

राष्ट्रपती निवडणुकीसह राजकीय मुद्यांवर ऊहापोह
नागपूर - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची महाल येथील संघ मुख्यालयात सोमवारी सायंकाळी भेट घेतली. तब्बल एक तास राष्ट्रपती निवडणुकीसह विविध राजकीय मुद्यांवर सरसंघचालकांशी बंदद्वार चर्चा केली.

राष्ट्रपती निवडणुकीसह राजकीय मुद्यांवर ऊहापोह
नागपूर - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची महाल येथील संघ मुख्यालयात सोमवारी सायंकाळी भेट घेतली. तब्बल एक तास राष्ट्रपती निवडणुकीसह विविध राजकीय मुद्यांवर सरसंघचालकांशी बंदद्वार चर्चा केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला शनिवारी (ता.27) अनुपस्थित राहिलेले अमित शहा आज दुपारी 12 वाजता अचानकपणे नागपुरात दाखल झाले. त्याच विमानातून रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही आले. केंद्र सरकारला तीन वर्षे झाल्यानंतर शहा यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. जुलै महिन्यात राष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आहे. यापदासाठी संभाव्य उमेदवाराच्या नावावर चर्चा झाल्याचे समजते.

अमित शहा यांनी "रविभवन' या शासकीय विश्रामगृहात शहरातील आमदार व पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भाजपची राष्ट्रीय विस्तारक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा आढावा त्यांनी घेतला. येत्या 15 जूनपर्यंत ही योजना प्रत्येक मतदारसंघात राबवायची आहे.

प्रत्येक घराघरात भाजप पोचला पाहिजे, यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे निर्देश शहा यांनी बैठकीत दिले. बुथनिहाय बैठका तसेच भाजपच्या सदस्यांची भेट घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. स्वयंसेवी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती त्यांनी घेतली.
या बैठकीला भाजपचे शहराध्यक्ष व आमदार सुधाकर कोहळे, खासदार अजय संचेती, आमदार अनिल सोले, आमदार विकास कुंभारे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ. मिलिंद माने आदी उपस्थित होते.

गडकरी-शहा चुकामूक?
अमित शहा नागपुरात आले; परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात नव्हते. ते आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले. शहा हे शनिवारला गडकरी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, ते आलेच नाहीत. होकार देऊनही ते आले नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रेशीमबागेत सुरू असलेल्या रा. स्व. संघाच्या तृतीय वर्ष "संघ शिक्षा वर्गा'ला मार्गदर्शन करण्यासाठी अमित शहा जाणार होते; परंतु ते ऐनवेळी त्यांनी कार्यक्रम रद्द केला.

Web Title: nagpur vidarbha news amit shaha discussion with mohan bhagwat