महापालिकेने गुंडाळली प्लॅस्टिकविरोधी मोहीम

महापालिकेने गुंडाळली प्लॅस्टिकविरोधी मोहीम

नागपूर - प्लॅस्टिकमुळे पर्यावरणासोबत शहरातील नागरिकांच्या जीवालाही धोका असल्याची जाणीव महापालिकेलाही आहे. त्यामुळेच अधिकाऱ्यांना अभ्यास दौऱ्यावर पाठवून प्लॅस्टिकविरोधात मोहिमेची आखणी केली. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या माध्यमाने शहरातील प्लॅस्टिक गोळा करण्याची प्रक्रियेलाही सुरुवात केली. मात्र, सुरू होताच महापालिकेने ही मोहीम गुंडाळली. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक जागोजागी पडल्याचे आढळून येत असून स्वच्छता मोहिमेसोबत नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. 

उपराजधानीला प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी महापालिकेने चार वर्षांपूर्वी पहिले पाऊल टाकले होते. प्लॅस्टिक पिशव्यांच्या अतिवापरामुळे शहरातील पर्यावरण प्रदूषण वाढत आहे. प्लॅस्टिकमुळे शहरातील नाल्या, सिवर, गडरलाइन चोक होतात. अस्वच्छताही वाढत आहे, त्यावर अधिकारी, कर्मचाऱ्यांची उर्जा खर्च होत असल्याची जाणीव महापालिकेला झाली होती. त्यामुळे प्लॅस्टिकविरोधी मोहिमेसाठी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना दूत निवडले होते. विद्यार्थी आठवड्यातून एकदा आपापल्या घरातील प्लॅस्टिक पिशव्या शाळेत जमा करतील. एका संस्थेच्या मदतीने त्या मोजून विकल्या जातील. त्यातून गोळा झालेले पैसे शाळेच्या विकासात खर्च करण्यात येतील.

अशाप्रकारचा सकारात्मक प्रयोग करण्याची घोषणा तत्कालीन आरोग्य समिती सभापती रमेश सिंगारे यांनी केली होती. यासंदर्भात महापालिकेने मनपा शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, झोन अधिकाऱ्यांची कार्यशाळाही घेण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासंदर्भात महापालिकेतील तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. अशोक उरकुडे व तत्कालीन शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी पुणे येथे जाऊन अभ्यासही केला होता. परंतु, डॉ. उरकुडे निवृत्त झाले तर लोखंडे यांची महापालिकेतून बदली झाली. त्यानंतर महापालिकेने ही मोहीमच थंडबस्त्यात टाकली. परिणामी आज शहरातील डम्पिंग यार्डमधील कचऱ्यात प्लॅस्टिकचे मोठे ढिगारे दिसून येत असून वर्षातून अनेकदा आगीमुळे प्रदूषणात भर पडत आहे. महापालिकेच्या एका चुकीमुळे आज शहरातील शेकडो जनावरे प्लॅस्टिकमुळे मृत्यूमुखी पडत आहे. भांडेवाडीतील आगीत जळणाऱ्या प्लॅस्टिकमधून निघणाऱ्या धुराने लाखो नागरिकांना आरोग्याची समस्या निर्माण झाली. परंतु अद्यापही महापालिका याबाबत गंभीर नसल्याचेच दिसून येत आहे.   

प्लॅस्टिकचा दुष्परिणाम होणारे घटक 
जमीन - प्लॅस्टिकमुळे जमिनीची सुपीकता कमी होते. जमिनीतील अंतर्गत पाण्याचा निचरा नीट होत नाही. पोषक द्रव्यांचा नाश होतो. 
 

प्राणी - वापरलेले प्लॅस्टिक खाल्ल्याने गुरांचा मृत्यू होतो. त्यांच्या प्रजनन प्रक्रियेवरही तसेच दुग्धोत्पादन क्षमतेवर परिणाम होऊन अपंगत्व असलेली गुरे जन्म घेतात. 

मानवी जीवन - प्लॅस्टिक बॅगमध्ये कडधान्ये लवकर खराब होतात. त्याला बुरशी लागते. असे पदार्थ सेवन केल्याने मानवी आरोग्य धोक्‍यात येते. प्लॅस्टिक जाळल्याने विषारी वायूमुळे मानवी यकृतावर, श्वसनप्रक्रियेवर परिणाम होतो.

नागरिकही बेजबाबदार 
बाजारात कधी काळी कापडी पिशव्यात सामान खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांनीही प्लॅस्टिकलाच प्राधान्य दिले. दुकानदाराने प्लॅस्टिक पिशवीत साहित्य दिले. त्याचवेळी एकाही नागरिकांकडून विरोध होत नाही. परिणामी आज दुकानांतून घराघरात अन्‌ घरातून कचरा गाडी व त्यानंतर डम्पिंग यार्ड असा प्लॅस्टिकचा प्रवास बिनबोभाटपणे सुरू आहे. नागरिकांनीही दुकानदारांना प्लॅस्टिक पिशव्यांसाठी नकार देऊन प्लॅस्टिकमुक्त शहराची जबाबदारी घेण्याची गरज अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांतचे गजानन पांडे यांनी व्यक्त केली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com