सायब, गडकरी सायबांचं पत्र हाय जी...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

अंध विनोद उकेची कैफियत - एंजिओग्राफीसाठी पाच हजार कोठून आणू?

नागपूर - सुपर स्पेशालिटीत आमदार गिरीश व्यास रुग्णांच्या व्यथा ऐकत होते. समोर पांढऱ्या काठीचा आधार घेत दृष्टिहीन विनोद उके पुढे आला. ‘सायब, माह्याकडं गडकरी सायबांचं पत्र हाय, तरीही उपचार होत नाय...

अंध विनोद उकेची कैफियत - एंजिओग्राफीसाठी पाच हजार कोठून आणू?

नागपूर - सुपर स्पेशालिटीत आमदार गिरीश व्यास रुग्णांच्या व्यथा ऐकत होते. समोर पांढऱ्या काठीचा आधार घेत दृष्टिहीन विनोद उके पुढे आला. ‘सायब, माह्याकडं गडकरी सायबांचं पत्र हाय, तरीही उपचार होत नाय...

आता मी पाच हजार रुपये कोठून आणूजी...’ ही व्यथा ऐकल्यानंतर आमदार व्यास भडकले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्राला किंमत नसल्याचे त्यांच्या नजरेला पडले. परंतु, यातील सत्य वेगळेच होते. बीपीएल असो की श्रीमंत राजीव गांधी आरोग्य योजनेचा लाभ मिळण्यापूर्वी एनजिओप्लास्टीसाठी प्रत्येकाला पाच हजार रुपये भरावेच लागतात, हा वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचा नियम आहे. हा नियम मोडण्याचे अधिकार ना अधिष्ठातांना आहे, ना हृदयरोग विभागातील डॉक्‍टरांना... 

दुर्धर व्याधींनी खंगलेल्या गरिबांच्या वेदनांवर फुंकर घालावी म्हणून सरकार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असो, मेडिकल असो की, मेयो येथे कोट्यवधीचा खर्च करते. परंतु अंध, अपंग, शेतकरी, गरिबांना हृदयातील ब्लॉकेजच्या निदानासाठी ‘एंजिओप्लॉस्टी’साठी पाच हजार रुपये उपलब्ध करून देत नाही. 

या विषयावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलू, असे आश्‍वासन आमदार व्यास यांनी दिले. 

डॉ. श्रीगिरीवारांची योजना ‘फेल’
सुपरची वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी तत्कालीन विशेष कार्याधिकारी डॉ. मनीष श्रीगिरिवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. खाटा कमी असल्याने प्रतीक्षा यादीतील रुग्णांच्या घरी फोन करून रुग्णाला बोलावले जात असे. यामुळे सुपरमध्ये गर्दी होत नव्हती आणि वेटिंग लिस्ट कमी होत होती. हा फंडा आता फेल पडला आहे. सुपरच्या आवारात रुग्णांचे नातेवाईक आज नाहीतर उद्या होईल शस्त्रक्रिया या प्रतीक्षेत दोन महिन्यांपासून असतात.

लक्ष्मीबाई २ महिन्यांपासून शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत
राजीव गांधी जीवनदायी गरिबांच्या हृदयाविकारावर वरदान ठरली आहे. मात्र येथील सीव्हीटीएस विभागात गेल्या दोन महिन्यांपासून ऐंशी वर्षांची लक्ष्मीबाई भगत खेटा घालत आहेत. त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया होत नाही. औषधंही मोफत मिळत नाही. लक्ष्मीबाईंना ज्येष्ठ नागरिक योजनेचे सारे लाभ मिळावेत. औषधही मोफत मिळावे. एकही रुपया खर्च होऊ नये. परंतु दरवेळी खासगीतून औषधं खरेदी करावी लागत असल्याची व्यथा आजीबाईच्या मुलीने बोलून दाखवली. हृदय विभागात दर दिवसाला केवळ एक सर्जरी होते, असे सांगण्यात येते. यामुळे आपोआपच शस्त्रक्रियांची प्रतीक्षा यादी वाढत आहे. 

Web Title: nagpur vidarbha news blind vinod uke condition