न भूतो न भविष्यति विकासकामे - मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

नागपूर - राज्यात न भूतो न भविष्यति स्वरूपाची विकासकामे सुरू असून, त्याद्वारे मागासलेल्या भागांनाही समृद्धी प्राप्त होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वर्धा मार्गावरील चिंचभुवन येथे उभारण्यात येत असलेल्या खापरी रेल्वे उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.

नागपूर - राज्यात न भूतो न भविष्यति स्वरूपाची विकासकामे सुरू असून, त्याद्वारे मागासलेल्या भागांनाही समृद्धी प्राप्त होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वर्धा मार्गावरील चिंचभुवन येथे उभारण्यात येत असलेल्या खापरी रेल्वे उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे रविवारी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री. सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, आशीष देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, समीर मेघे, जि. प. अध्यक्षा निशा सावरकर मंचावर उपस्थित होते.  

मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या प्रारंभीच मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ पालकमंत्र्यांच्या मतदारसंघाशी जोडण्यासाठी हा पूल होत असल्याची गुगली टाकून उपस्थितांची दाद मिळविली. अस्तित्वातील अवरुद्ध पुलामुळे सर्वाधिक अपघात आणि वाहतूककोंडीची समस्या होती. चौपदरी पुलामुळे समस्यांना आळा बसून हे अपघातमुक्त क्षेत्र होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र शासनाच्या माध्यमातून नागपुरात अनेक विकासकामे सुरू आहेत. उद्योग, शैक्षणिक संस्था येत असल्याने पाच वर्षांत शहर आणि जिल्ह्याचा चेहरामोहराच बदलेल. मेक इन इंडिया अंतर्गत ट्विनस्टार कंपनी बुटीबोरी परिसरात १६ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याने या भागात समृद्धी येईल. राज्यात ७० वर्षांत केवळ ६ हजार किमीचे रस्ते होते. पाच वर्षांतच तीन पट म्हणजे २२ हजार किमीचे रस्ते होणार आहेत. 

समृद्धी महामार्गामुळेही विकासाला चालना मिळेल. या विकासकामांमुळे राज्यात समृद्धी नांदेल, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री बावनकुळे यांनी या पुलामुळे सततच्या अपघातांपासून मुक्ती मिळणार असल्याचे सांगितले. शहरात सुरू असलेल्या आणि येऊ घातलेल्या विकासकामांची माहिती देत पुढील दोन वर्षांत स्वप्नातील नागपूर साकारले जाईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक ओ. बी. तावडे यांनी तर संचालन रेणुका देशकर यांनी केले. एम. चंद्रशेखर यांनी आभार मानले.

जिल्ह्यात १२ हजार कोटींचे रस्ते - गडकरी
जिल्ह्यात २ हजार ९८६ कोटींचे रस्तेप्रकल्प सुरू आहेत. ८ हजार १२६ कोटींच्या प्रकल्पांचा लवकरच प्रारंभ होणार असून, १२ हजार कोटींचे रस्ते प्रकल्प साकारले जातील, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच येथे चारपदरी पूल उभारण्याचा मानस होता. पण, ते शक्‍य झाले नाही. अत्यंत गरजेच्या या पुलाच्या कामाला प्रारंभ झाला. कामासाठी २ वर्षांचा अवधी असला तरी एका वर्षात कामे पूर्ण करून पुलाचे उद्‌घाटन करण्यात येईल. मनीषनगर येथे कोणतीही घरे न पाडता उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. खाली रस्ता आणि मेट्रोला जोडणारा उड्डाणपूल असे डिझाइन तयार करण्यात आले. त्यासाठी २० कोटींचा निधीही देण्यात आला असून, लवकरच भूमिपूजन होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मिहानमधील एचसीएलतर्फे ३ महिन्यांमध्ये २ हजार अभियंत्यांना सेवेत घेतले जाईल. विदर्भातील ५० हजार युवकांना रोजगार देण्याचे आश्‍वासन पाच वर्षांपूर्वीच पूर्ण होईल, असा विश्‍वासही त्यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur vidarbha news development work