अतिवृष्टीवर चर्चेला बहुमताने नाकारले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

स्थनगप्रस्तावावर प्रथमच मतदान - सत्ताधाऱ्यांवर संवेदनाहीनतेचा विरोधकांचा आरोप 

स्थनगप्रस्तावावर प्रथमच मतदान - सत्ताधाऱ्यांवर संवेदनाहीनतेचा विरोधकांचा आरोप 

नागपूर - शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक वस्त्यांत पाणी शिरले, यावर प्रशासनाकडून होणाऱ्या उपाययोजनांवर चर्चेसाठी विरोधी पक्षाच्या सदस्याने दिलेला स्थगनप्रस्ताव महापौरांनी पुन्हा एकदा फेटाळला. त्यामुळे संतप्त विरोधकांनी स्थगनप्रस्तावावर चर्चेसाठी मतदानाची मागणी केली. मतदानात स्थगनप्रस्तावावर चर्चेच्या बाजूने केवळ ३४ तर विरोधात १०९ मते पडली. सत्ताधाऱ्यांची संवेदना बोथड झाल्याचा आरोप करीत सामान्य नागरिकांच्या प्रश्‍नावरील त्यांचे गांभीर्यही अधोरेखित झाल्याचा टोला विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी लगावला. 

शुक्रवारी रात्री शहरात अतिवृष्टी झाली. तीन तासांत १४१.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे रात्री शहरातील अनेक खोलगट भाग, वस्त्यांमध्ये पाणी शिरले. विशेषतः गरिबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नगरसेवकही रात्रभर नागरिकांच्या मदतीला होते. या अतिवृष्टीवर प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात आल्या किंवा करण्यात येणार आहे, यावर चर्चेसाठी विरोधी पक्षातील सदस्य बंटी शेळके यांनी महापौरांना स्थगनप्रस्ताव दिला. मात्र महापौर नंदा जिचकार यांनी मागील सभेप्रमाणे याही सभेत विरोधकांचा स्थगनप्रस्ताव फेटाळला. त्यामुळे संतप्त विरोधकांनी पराभवाची खात्री असतानाही मतदानाची मागणी केली.

मतदानात स्थगनप्रस्तावावर चर्चेच्या बाजूने ३४ तर विरोधात १०९ मते पडली. त्यामुळे विरोधकांच्या चर्चेच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. मात्र, त्याचवेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा उघड झाल्याचे नमुद केले. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सत्ताधारी भाजप, महापौर गरिबांच्या नुकसानीबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला. नंदनवन, भुतेश्‍वरनगर, सिरसपेठसह शहरातील अनेक प्रभागांमध्ये पाणी साचल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले. 

सभेचा वेळ घालविणे योग्य नाही 
काँग्रेस सदस्य बंटी शेळके यांनी त्यांच्या प्रभागातील वस्त्यांत पाणी शिरल्याचा स्थगनप्रस्ताव दिला. रात्री वस्त्यांमध्ये पाणी शिरले. या वस्त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता सकाळी पाणी निघून गेले व परिस्थिती आटोक्‍यात असल्याचे समजले. त्यामुळे स्थगनप्रस्तावावर सभेचा वेळ घालविणे योग्य नाही, असे सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनीही सत्ताधाऱ्यांसोबत यासंबंधी चर्चा केली नसल्याचेही ते म्हणाले.

वायफळ विषयावर चर्चेला वेळ 
माहिती अधिकार हा विषयच केंद्र सरकार किंवा न्यायालयाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे महापालिका सभागृहात यावर चर्चेचा काय उपयोग? असा सवाल करीत यावर वायफळ चर्चेला सत्ताधाऱ्यांकडे वेळ आहे, असा टोला विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी लगावला. त्यांनी माहिती अधिकारात माहिती मागणारे नागरिक आता समाजकंटकही झालेत काय? वर्तमानपत्रातील वृत्ताबाबतही सत्ताधारी नगरसेवकाने शंका उपस्थित करून वर्तमानपत्राच्या विश्‍वसनीयतेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले, असेही वनवे म्हणाले.

Web Title: nagpur vidarbha news Discussion on the overwhelming majority rejected