मोफत डस्टबिनची पळवापळवी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

नागपूर - घरांमध्येच ओला व सुक्‍या कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी मोफत डस्टबिन वितरणालाच आशीनगर झोनमध्ये गालबोट लागले. मोफत डस्टबिनची संख्या कमी असल्याने नागरिकांनी त्या पळविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे अधिकाऱ्यांच्या अंगावरही नागरिक चालून गेले. काही झोनमध्ये नाव नोंदणी करून कचरापेटी देण्यात आल्याने नागरिकांनी केवळ नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांना डस्टबिन देण्यात येत असल्याचा आरोप करीत संताप व्यक्त केला.
जागतिक पर्यावरणदिनानिमित्त आजपासून घराघरांत ओला व सुक्‍या कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी हिरव्या व निळ्या रंगाच्या डस्टबिनचे वितरण प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आले. मंगळवारी व लक्ष्मीनगर झोनमध्ये महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झोपडपट्टीधारकांना डस्टबिन वितरित करण्यात आले. आसीनगरमध्ये आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या हस्ते वितरणाची प्रक्रिया सुरू असतानाच रांगेतील नागरिकांनी डस्टबिन संपुष्टात येत असल्याने त्यांनी गोंधळ घातला. यावेळी अधिकाऱ्यांनी नाव नोंदविण्याचे आवाहन केले. परंतु, अधीर झालेल्या नागरिकांनी डस्टबिन उचलून पोबारा केला. याच झोनमधील पाटणकर चौकात नागरिक सहायक आयुक्त व आरोग्य निरीक्षकांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. नेहरूनगर झोनमध्ये आधी रांगेत लागलेल्यांची नोंद करून बसवून ठेवण्यात आले. नगरसेवकांनी आणलेल्यांना कचरापेटी वितरित करण्यात येत असल्याने नागरिक चिडले. येथे काहींना एकच कचरापेटीही मिळाल्याची माहिती आहे. गांधीबाग झोनमधील कार्यक्रम गोळीबार चौकात, लकडगंज झोनचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान वर्धमाननगर व सूर्यनगरातील लता मंगेशकर उद्यानात पार पडला. सतरंजीपुरा झोनचा कार्यक्रम बिनाकी मंगळवारी, धरमपेठ झोनचा कार्यक्रम अंबाझरी उद्यानात पार पडला. यासोबतच झोनतर्फे सुदामनगरी व फुटाळा येथे कचरापेटीचे वितरण करण्यात आले. धंतोली, हनुमाननगर झोनचा कार्यक्रम झोन कार्यालयात पार पडला.

डस्टबिनच्या दर्जावर नाराजी
डस्टबिनच्या दर्जावर पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे चित्र दिसून आले. त्यामुळे भविष्यात प्रशासनावर टीकेची झोड उठण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. खुद्द आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनीही कचरापेटीच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली. शहरातील काही कार्यक्रमाला केंद्र शासनाच्या शहर विकास मंत्रालयाचे अप्पर सचिव दीनदयाल, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, उपायुक्त जयंत दांडेगावकर, सर्व झोनचे सहायक आयुक्त, झोनमधील नगरसेवक व नगरसेविका, मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांना दिली स्वच्छतेची शपथ
स्वच्छता अभियानाअंतर्गत पर्यावरण दिनापासून सुरू झालेल्या ओला आणि सुका कचरा विलगीकरण प्रक्रियेचा हेतू लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. सोमवारी डस्टबिनचे वाटप करण्यापूर्वी वेगवेगळ्या झोनमधील कार्यक्रमातून महापौर नंदा जिचकार, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार विकास कुंभारे, झोन सभापती, अधिकाऱ्यांनी नागरिकांना स्वच्छतेची शपथ दिली.
Web Title: nagpur vidarbha news free dustbin by municipal