‘स्टार इमेज’ने कधीच भुरळ घातली नाही - गोविंद निहलानी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

नागपूर - ‘मला नटांच्या ‘स्टार इमेज’ने कधीच भुरळ पाडली नाही. आम्ही नटांच्या ‘टॅलेंट’ने भारावलेलो होतो. कथानकाला साजेशे पात्र साकारणारा आणि ‘टॅलेंट’ असले तरी आर्थिकदृष्ट्या परवडणारा नट हेच माझे निकष होते,’ असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी आज (रविवार) अभिनेत्री शबाना आझमी यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर  व्यक्त केले. ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनच्या वतीने आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.

नागपूर - ‘मला नटांच्या ‘स्टार इमेज’ने कधीच भुरळ पाडली नाही. आम्ही नटांच्या ‘टॅलेंट’ने भारावलेलो होतो. कथानकाला साजेशे पात्र साकारणारा आणि ‘टॅलेंट’ असले तरी आर्थिकदृष्ट्या परवडणारा नट हेच माझे निकष होते,’ असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी आज (रविवार) अभिनेत्री शबाना आझमी यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर  व्यक्त केले. ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनच्या वतीने आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.

पर्सिस्टंटच्या कालिदास सभागृहात आयोजित या कार्यक्रमात सुप्रसिद्ध निवेदक अजेय गंपावार  यांनी मुलाखतीद्वारे गोविंद निहलानी यांना बोलते केले. अगदी बालपणापासून ते अलीकडच्या दिवसांपर्यंतचे आठवणींचे पट यातून उलगडले. ‘अर्धसत्य’, ‘आक्रोश’ यांसारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांसह व्ही. के. मूर्ती, विजय तेंडुलकर, श्‍याम बेनेगल या दिग्गजांसोबत आलेले अनुभवही त्यांनी शेअर केले. विजय तेंडुलकर यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘तेंडुलकरांचे सामाजिक आणि राजकीय भान अफलातून होते. ते अत्यंत प्रामाणिक लेखक होते. 

‘सखाराम बाइंडर’सारख्या नाटकांमधून त्यांच्यातील लेखकाचे धैर्य सर्वांनीच बघितले. ‘अर्धसत्य’चे चित्रीकरण सुरू असताना त्यांनी लिहिलेला शेवट मला बदलावासा वाटला. मी त्यांना विचारले तेव्हा स्पष्ट नकार मिळाला. पण, माझ्या मनातला आणि त्यांच्या कथेतला असे दोन्ही शेवट मी चित्रित केले आणि त्यांना दाखवले. कुठल्याही बाबतीत सतत खुल्या मनाने विचार करणारे विजय तेंडुलकर यांनी मी केलेला बदलही आनंदाने स्वीकारला.’ ‘अर्धसत्य’मधील ओम पुरी आणि स्मिता पाटील यांचा एक प्रसंग यावेळी दाखविण्यात आला. ‘गांधी’ चित्रपटात रिचर्ड अटॅनबर्ग यांच्यासोबत सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करण्याचा अनुभव कायम स्मरणात राहणारा असल्याचे त्यांनी सांगितले. जलियाँवाला बाग हत्याकांडाचा प्रसंग सिनेमॅटोग्राफर म्हणून चित्रित करण्याची संधी मिळाली. मी एकच प्रसंग शूट केला, पण त्या अनुषंगाने माझ्या डोक्‍यात  असलेला क्रम मला प्रत्यक्षात चित्रपटात बघायला मिळाला, असे ते सांगतात. यावेळी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी गोविंद निहलानी यांचे स्वागत केले. प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी भूमिका मांडली.

‘सरप्राईज’ने भारावले
मुलाखत सुरू होण्यापूर्वी अजेय गंपावार यांनी गोविंद निहलानी यांना ‘कलात्मक सरप्राईज’ दिले. युवा रंगकर्मी रूपेश पवारच्या दिग्दर्शनात राष्ट्रभाषा परिवारच्या कलावंतांनी गोविंद निहलानी यांच्या चित्रपटांमधील पात्र रंगमंचावर उभे केले. ‘अर्धसत्य’, ‘आक्रोश’, ‘तमस’ या काही चित्रपटांची कथा आणि त्यातील पात्र एका छोट्या नाटिकेत गुंफण्यात आले. ‘माझ्यासाठी हे अनपेक्षित होते. अशा पद्धतीने स्वागत स्वीकारताना मी भारावलोय,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ओम पुरी म्हणजे ‘रिस्ट वॉच’
हाताची घड्याळ नेहमी योग्य वेळ सांगत असते. कानापाशी आणल्यावरच तिचा आवाज ऐकू  येतो. ओम पुरी या ‘रिस्ट वॉच’प्रमाणे होता. तो परफॉर्म करण्यापूर्वी खूप तयारी करायचा, पण प्रत्यक्ष परफॉर्म करताना त्याची तयारी नव्हे, तर नैसर्गिक अभिनय बघायला मिळायचा, असे वर्णन निहलानी करतात.

Web Title: nagpur vidarbha news govind nihlani talking