ओला व सुका कचरा वर्गीकरण सक्तीचे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

आजपासून प्रतिसाद न देणाऱ्यांवर कारवाई - दहाही झोनमध्ये डस्टबीनचे वितरण

नागपूर - पर्यावरण दिन अर्थात उद्यापासून शहरात ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे घरांमध्येच वर्गीकरण करण्याचे महापालिकेने सक्तीचे केले आहे. महापालिकेने झोपडपट्टीधारकांना मोफत डस्टबीन देण्याचा निर्णय घेतला असून उद्या दहाही झोनमध्ये वितरण करण्यात येणार आहे. शहर स्वच्छतेसाठी प्रतिसाद न देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

आजपासून प्रतिसाद न देणाऱ्यांवर कारवाई - दहाही झोनमध्ये डस्टबीनचे वितरण

नागपूर - पर्यावरण दिन अर्थात उद्यापासून शहरात ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे घरांमध्येच वर्गीकरण करण्याचे महापालिकेने सक्तीचे केले आहे. महापालिकेने झोपडपट्टीधारकांना मोफत डस्टबीन देण्याचा निर्णय घेतला असून उद्या दहाही झोनमध्ये वितरण करण्यात येणार आहे. शहर स्वच्छतेसाठी प्रतिसाद न देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरांमधून कचरा विलगीकरण करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. उद्यापासून शहरात ओला व सुका कचरा अनुक्रमे हिरव्या व निळ्या रंगाच्या डस्टबीनमध्ये गोळा करायचा आहे. उद्यापासून कचरा उचलणारा कनक रिसोर्सेसचा कर्मचारी घरमालकाकडून दोन डस्टबीनमधील कचरा गोळा करणार आहे. त्यामुळे नागरिकांना उद्यापासून घरात दोन डस्टबीन ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. सरसकट सर्व नागरिकांना मोफत डस्टबीन देण्याऐवजी झोपडपट्टीधारकांना देण्यात येईल. उद्या दहाही झोनमध्ये स्थानिक नेते, सभापतींच्या हस्ते डस्टबीन वितरण करण्यात येईल. नागरिकांसोबत दुकानदारांनाही दोन डस्टबीन दुकानांमध्ये ठेवावा लागणार आहे. डस्टबीन वापरण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांसोबतच रोटरी क्‍लब ऑफ नागपूर, ग्रीन व्हिजिल, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट सेंटर, मैत्री परिवार, सृष्टी पर्यावरण संस्था, वृक्षसंवर्धन समिती, धंतोली नागरिक मंडळ, ग्रीन फाउंडेशन, स्वच्छ असोसिएशन, आय क्‍लीन या संस्थांची मदत घेण्यात येत आहे. हॉकर्स, हॉटेल, मॉल्स, भाजी बाजार, रेल्वे स्टेशन, सरकारी व खासगी कार्यालये या सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर पत्रके वितरित करण्यात आले आहे. हॉकर्स लोकांना सक्तीने दोन रंगांच्या डस्टबीन ठेवण्याच्या सूचना देण्यात येणार आहे. रात्री आठला मनपा व कनकचे कर्मचारी त्यांच्याकडून विलगीकरण केलेला कचरा जमा करणार आहे.

कचरा निर्मात्यांनी (घर, दुकान, व्यवसायाचे ठिकाण, संस्था इ.) त्यांच्याकडे निर्माण होणारा ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात तर सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात ठेवून मनपाच्या कचरा संकलन यंत्रणेकडे सुपूर्द करावा. 
- नंदा जिचकार, महापौर  

या संपूर्ण अभियानात शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यास आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी व्हावे. कचरा हिरव्या व निळ्या रंगाच्या डस्टबीनमध्ये गोळा करावा. 
-अश्‍विन मुदगल, आयुक्त.

Web Title: nagpur vidarbha news Hail and dry waste classification forced