चार दिवसांत रक्‍कम भरायची कशी?

नीलेश डोये
सोमवार, 26 जून 2017

जाचक अटींमुळे कर्जमाफीचा लाभ अशक्‍य

नागपूर - शासनाने शेतकऱ्यांचे सरसकट दीड लाखापर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. ज्या शेतकऱ्यांवर दीड लाखापेक्षा जास्त रक्कम थकीत आहे, अशांना  कर्जमाफीच्या लाभासाठी ३० जूनपर्यंत उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे. शेतकऱ्यांकडे थकीत रक्कम भरण्यासाठी तीन, चार दिवसांचाच अवधी आहे. एवढ्या कमी वेळात ही रक्कम भरणे शेतकऱ्यांना शक्‍य नसल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ही घोषणाही फसवीच ठरणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.

गेल्या काही वर्षांपासून राज्यात पडत असलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केली. कर्जमाफीसाठी विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली, सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही असहकार पुकारला. स्वतंत्र भारतात राज्यात प्रथमच शेतकरी संपाचे हत्यार उपसले. शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे झुकत सरकारने दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा ९० लाख शेतकऱ्यांना होईल, असा दावाही केला जात आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हजारो शेतकऱ्यांकडे दीड लाखापेक्षा जास्त कर्ज थकीत आहे. शासनाने कर्जमाफी देताना दीड लाखावरील कर्जाची रक्कम ३० जनूपर्यंत फेडण्याची अट घातली. म्हणजे एक जुलैला किंवा त्यानंतर रक्कम भरल्यास कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. खरीप कर्जासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत असते. मात्र, शासनाने रक्कम  फेडण्यासाठी ३० जूनची अट घातली. 

कर्जमाफीचा शासन निर्णय सोमवारची सुटी असल्याने मंगळवारी (ता. २७) निघेल. त्यामुळे शेतकऱ्यांना दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी तीन-चार दिवसांचाच वेळ मिळणार आहे. शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने पेरणीची कामे रखडली आहेत. त्यातच शासनाच्या निर्णयानुसार  तीन, चार दिवसांत रक्कम जमा करून बॅंकेत जमा करायची आहे. परिणामी, शेतकऱ्यांना या रकमेसाठी सावकारांच्या दारीच जावे लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. २००८ मध्ये झालेल्या कर्जमाफीच्या वेळी पाच एकरपेक्षा अधिक शेती असलेल्या शेतकऱ्यांचे २५ टक्के कर्ज माफ केले होते. त्यावेळी ७५ टक्के कर्ज भरण्यासाठी तीन वर्षांचा वेळ दिला होता, हे विशेष.

Web Title: nagpur vidarbha news loanwaiver problem to farmer