खासदार पटोलेंना आरोप करण्याची सवय - माधव भंडारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

नागपूर - काँग्रेसमध्ये असल्यापासून खासदार नाना पटोले यांना पक्षातील नेत्यांवर आरोप करण्याची सवय आहे. राज्य सरकारने चांगली कामगिरी केल्यानंतर भाजपचे खासदार नाना पटोले पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर वारंवार टीका करीत आहे. पटोले काँग्रेसमधून भाजपात आलेले आहेत.

नागपूर - काँग्रेसमध्ये असल्यापासून खासदार नाना पटोले यांना पक्षातील नेत्यांवर आरोप करण्याची सवय आहे. राज्य सरकारने चांगली कामगिरी केल्यानंतर भाजपचे खासदार नाना पटोले पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर वारंवार टीका करीत आहे. पटोले काँग्रेसमधून भाजपात आलेले आहेत.

काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी काँग्रेस नेत्यांवर आरोप केले होते. पक्ष सोडायचा असला की, ते पक्ष नेतृत्वावर टीका करीत असतात. ही त्यांना सवयच असल्याचे भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी यांनी सांगितले.
त्यांच्यावरील कारवाईबद्दल ते म्हणाले, खासदारावर कारवाई करण्याचा अधिकार केंद्रीय संसदीय मंडळाला असतो. संसदीय मंडळ योग्यवेळी निर्णय घेईल.

फडणवीस सरकारला तीन वर्षे झाल्याबद्दल राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती देताना भंडारी यांनी प्रगती पुस्तकाचा पाढा वाचला. शिवसेनेने घोटाळ्याची पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, फडणवीस सरकारने विश्‍वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर दोन महिन्यांनी राज्य सरकारमध्ये शिवसेना सामील झाली आहे. फडणवीस सरकारच्या विश्‍वास दर्शक ठरावात शिवसेनेची कोणतीही भूमिका नव्हती. राज्य सरकारला केवळ स्थिरता मिळावी, यासाठी भाजपने शिवसेनेला सामील करून घेतले आहे. महायुतीतील इतर पक्षाचे नेते भाजपचे सदस्य झालेले आहेत. त्यामुळे फडणवीस सरकार हे फक्त भाजपचा असल्याचा दावा भंडारी यांनी केला. 

राज्यातील शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपले प्रगती पुस्तक जनतेसमोर सादर करावे, असा सल्ला  भंडारी यांनी दिला. शिवसेनेच्या मंत्र्यांकडे उद्योग, पर्यावरण, परिवहन ही महत्त्वाची खाती आहेत. या मंत्र्यांनी या खात्यात केलेल्या कामाची माहिती देणे योग्य ठरेल, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले, प्रत्येक पक्षाचा नेता कुणालाही भेटू शकतो. यामुळे सरकारवर मात्र  कोणताही परिणाम होणार नाही. फडणवीस सरकार भक्कम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

गेल्या तीन वर्षांत राज्य सराकरने पायाभूत सुविधा, सिंचन व रस्ते विकासाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याचा दावा त्यांनी केला. विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे गोसेखुर्द प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आठवडी बाजारसारखी अभिनव योजना राबविल्या जात असल्याचे ते म्हणाले. 

या वेळी आमदार गिरीश व्यास, किशोर  पलांदूरकर, भोजराज डुंबे व चंदन गोस्वामी होते.

Web Title: nagpur vidarbha news madhav bhandari talking