आधुनिकीकरणास कारणीभूत ठरले उंदीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

गोव्यात तीन माळ्यांचे पंचतारांकित शवविच्छेदनगृह आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेच्या निकषाप्रमाणे संगणकीय रेकॉर्ड खोली, ऑटोप्सी खोलीसह ५० विद्यार्थी बसू शकतील असे सभागृह, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्‍टरांची खोली, ५० मृतदेह ठेवता येतील अशा शीतपेट्या, अशा विविध शिफारशी यात सुचविल्या आहेत. 
- डॉ. मनीष श्रीगिरीवार, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ

नागपूर - नुकतेच राज्य शासनात उंदीर घोटाळा झाला. सात दिवसांत ३ लाख १९ हजार उंदीर मारल्याच्या चर्चेने राज्य गाजले. मात्र, नागपुरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात (मेयो) उंदरांनी शवविच्छेदनगृहात मृतदेहाचे डोळे, नाक आणि कान कुरतडल्याची घटना राज्यभरातील शवविच्छेदनगृहांच्या आधुनिकीकरणास कारणीभूत ठरली. चक्क ५३ कोटी ३५ लाख रुपये खर्च करून राज्यभरातील मेडिकल कॉलेजमधील शवविच्छेदनगृहे अद्ययावत करण्यात येणार आहेत.    

मेयो रुग्णालयात उंदीरमामांनी दोन मृतदेह कुरतडल्याचे प्रकरण ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. मृतदेहाची विटंबना होत असल्याच्या कारणामुळे नागपूरच्या सहयोग ट्रस्टतर्फे न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. मृत्यूनंतर मृतदेहांचा सन्मान व्हावा, ही माफक अपेक्षा व्यक्त करीत न्यायालयाने देशभरातील अद्ययावत शवविच्छेदनगृहांची पाहणी करीत राज्यातील शवविच्छेदनगृह अत्याधुनिक करण्याचे निर्देश दिले. 

न्यायालयाच्या निर्देशानुसार तीन जणांची समिती तयार केली. समितीत न्यायवैद्यकशास्त्रतज्ज्ञ डॉ. प्रदीप दीक्षित, न्यायवैद्यकतज्ज्ञ डॉ. मनीष श्रीगिरीवार, मुंबईच्या नायर हॉस्पिटलचे डॉ. शैलेश मोहिते यांचा समावेश होता. देशभरात समितीने दौरा केला. गोव्यातील बांबोलिम मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनगृह योग्य असल्याचा अहवाल समितीने न्यायालयासमोर सादर केला. न्यायालयाने राज्यभरातील सार्वजनिक आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदनगृहे अद्ययावत करण्याचा निर्णय देत सहयोग ट्रस्टची याचिका निकाली काढली. ॲड. स्मिता सरोदे-सिंगलकर आणि रवींद्र भुसारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची ही फलश्रुती ठरली. 

मेयोला ५ कोटी ९३ लाख   
-मेयो : ५ कोटी ९३ लाख 
-मेडिकल : २ कोटी ४३ लाख 
-धुळे मेडिकल कॉलेज : ८ कोटी ५४ लाख 
-अकोला मेडिकल कॉलेज : ६ कोटी ९१ लाख
-अंबेजोगई : ६ कोटी ४४ लाख 
-औरंगाबाद मेडिकल कॉलेज (घाटी) : ४ कोटी ९९ लाख 
-सोलापूर मेडिकल कॉलेज : ४ कोटी ९५ लाख 
-यवतमाळ मेडिकल कॉलेज : २ कोटी ६१ लाख
-कोल्हापूर मेडिकल कॉलेज : ९३ लाख ६१ हजार 
-गोंदिया मेडिकल कॉलेज : ७३ लाख ५० हजार 
-लातूर मेडिकल कॉलेज : १७ लाख १८ हजार 
-मुंबई जेजे कॉलेज : २५ लाख १६ हजार  

Web Title: nagpur vidarbha news Modernization mouse