उपराजधानी नंबर वन!

राजेश प्रायकर
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नागपूर - नुकताच हागणदारी मुक्त शहराचा मान मिळविणाऱ्या संत्रानगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. राज्य सरकारच्या हवा गुणवत्ता स्थितीदर्शक अहवालात नागपूरातील वातावरणात आरोग्यास हानीकारक सल्फर डाय ऑक्‍साईड व नायट्रोजन ऑक्‍साईड या रसायनाची पातळी कमी असल्याचे स्पष्ट केले. या तुलनेत पुणे, मुंबई, नांदेडमध्ये या रसायनाचे प्रमाण मानकापेक्षा अधिक असल्याचे नमुद केले असून, ही शहरांनी प्रदूषणाची पातळी ओलांडल्याचे दिसून येत आहे. 
शहरातील प्रदूषणाचे नागरिकांच्या जीवनावर विपरित परिणाम होते.

नागपूर - नुकताच हागणदारी मुक्त शहराचा मान मिळविणाऱ्या संत्रानगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. राज्य सरकारच्या हवा गुणवत्ता स्थितीदर्शक अहवालात नागपूरातील वातावरणात आरोग्यास हानीकारक सल्फर डाय ऑक्‍साईड व नायट्रोजन ऑक्‍साईड या रसायनाची पातळी कमी असल्याचे स्पष्ट केले. या तुलनेत पुणे, मुंबई, नांदेडमध्ये या रसायनाचे प्रमाण मानकापेक्षा अधिक असल्याचे नमुद केले असून, ही शहरांनी प्रदूषणाची पातळी ओलांडल्याचे दिसून येत आहे. 
शहरातील प्रदूषणाचे नागरिकांच्या जीवनावर विपरित परिणाम होते.

शहरातील वातावरणामधील सल्फर डाय ऑक्‍साईड, नायट्रोजन ऑक्‍साईड आणि धुलीकणाच्या प्रचंड प्रमाणामुळे नागरिकांचे जीवन धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. राज्य शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्याचा २०१६-१७ हवा गुणवत्ता स्थितीदर्शक अहवाल जाहीर केला. यात मुंबई, पुणे, औरंगाबाद विभागातील नांदेडजवळील सिडको परिसर प्रदूषणाच्या बाबतीत आघाडीवर आहे. मात्र, विदर्भातील नागपूरसह अमरावती, चंद्रपूर येथे सल्फर डाय ऑक्‍साईडचे प्रमाण २० मायक्रोग्रॅम प्रती मिटर क्‍युबपेक्षाही कमी आढळून आले. त्याचवेळी पुणे, कोल्हापूर येथे वातावरणातील सल्फर डाय ऑक्‍साईडचे प्रमाण २० ते ३० मायक्रोग्रॅम प्रती मिटर क्‍युब आढळून आले आहे. नागपूरसह चंद्रपूर, अमरावतील वातावरणातील नायट्रोजन ऑक्‍साईडचे प्रमाण ४० मायक्रोग्रॅम प्रती मिटर क्‍युबपेक्षाही कमी आहे.

त्याचवेळी पुणे शहराजवळ हवा गुणवत्ता परीक्षण केंद्राने स्वारगेट परिसरात सरासरी वार्षिक सर्वाधिक ८२ मायक्रोग्रॅम प्रतिमीटर क्‍युब नायट्रोजन ऑक्‍साईडची नोंद केली आहे. २०१५-१६ या वर्षात या परिसरातील वातावरणात नायट्रोजन ऑक्‍साईडचे प्रमाण ६६ मायक्रोग्रॅम प्रतिमीटर क्‍युब होते. मुंबईतील सिऑन परिसरात गेल्या सात वर्षांत नायट्रोजन ऑक्‍साईडचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. त्यामुळे या शहरांच्या तुलनेत संत्रानगरीतील नागरिकांना सल्फरडॉय ऑक्‍साईड व नायट्रोजन ऑक्‍साईडचा धोका कमी असल्याचे चित्र आहे.

धूलिकणांचे प्रमाण धोकादायक 
नागपुरातील वातावरणात सल्फरडॉय ऑक्‍साईड व नायट्रोजन ऑक्‍साईडचे प्रमाण कमी असले  तरी हिंगणा एमआयडीसी परिसरात धूलिकणाच्या प्रमाणाने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. धूलिकणाची वार्षिक सरासरी १०१ मायक्रोग्रॅम प्रतिमीटर क्‍युब आहे. चंद्रपूरजवळील घुग्घुसला कोळसा खाणीमुळे सर्वाधिक धूलिकण असून येथे वार्षिक सरासरी २४२ मायक्रोग्रॅम प्रतिमीटर क्‍युब आहे. 

ओझोनने वाढवली चिंता 
नायट्रोजन व वातावरणातील इतर रसायनामुळे तयार होणाऱ्या ओझोन वायूने मात्र नागपूरची चिंता वाढविली आहे. दमासारख्या आजाराला बळ देणाऱ्या ओझोन वायू संत्रानगरीतील वातावरणात  १६ टक्के अधिक आढळून आला आहे. त्यामुळे नागपुरातील वातावरणातून ओझोनचे प्रमाण  कमी करण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार करण्याची गरज प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यक्त केली आहे. 

वातावरण चांगले
नागपूरचे वातावरण चांगले व समाधानकार असल्याचा शेरा या अहवालाच्या शेवटी प्रदूषण  नियंत्रण मंडळाने मारला आहे. शहरातील वातावरणाच्या परीक्षण काळात ६० टक्के वातावरण चांगले असल्याचे म्हटले आहे. मात्र, एमआयडीसी हिंगणा परिसरात ५५ टक्के वातावरण चांगले असल्याचे नमूद केले आहे.

Web Title: nagpur vidarbha news nagpur number one