नवीन ‘स्वाइन फ्लू वॉर्ड’ बिनकामाचा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मेडिकलमधील वॉर्ड क्रमांक २५ मध्ये स्वाइन फ्लू बाधित रुग्णांवरील उपचारासाठी सर्व सोय आहे. येथे व्हेंटिलेटरपासून तर रक्त व इतर तपासणीच्या सोयी याच परिसरात आहेत. यामुळे वॉर्ड क्रमांक २५ यालाच ‘स्वाइन फ्लू वॉर्ड’ तयार करून नव्याने तयार केलेला स्वाइन फ्लू वॉर्ड इतर रुग्णांसाठी उपयोगात आणता येईल. 
- डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल.

नागपूर - विदर्भात २००९ सालापासून स्वाइन फ्लूची दहशत कायम आहे. दरवर्षी  स्वाइन फ्लू येतो. पन्नासपेक्षा जास्त बळी घेतो. नागपूर आणि अकोला विभागात मृत्यूचा आकडा फुगत आहे. विदर्भातील स्वाइन फ्लू बाधितांवर अद्ययावत उपचारासाठी मेडिकलमध्ये ‘स्वाइन  फ्लू वॉर्ड’ बांधण्यात आला. परंतु, या वॉर्डासाठी आवश्‍यक उपकरणे, व्हेंटिलेटर आणि  मनुष्यबळाचा प्रस्तावच सात वर्षांनंतरही मेडिकलमधील मेडिसीन विभागाने तयार केला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली. 

स्वाइन फ्लूचा प्रकोप लक्षात घेता जिल्हा नियोजन समितीने एक कोटी ९१ लाख रुपये  मेडिकलला स्वाइन फ्लू वॉर्ड बांधण्यासाठी दिले. या खर्चातून दोन वर्षांपूर्वी बांधून तयार झालेला हा स्वाइन फ्लू वॉर्ड अद्याप रुग्णसेवेसाठी दाखल होऊ शकला नाही. विशेष असे की, ज्या  ठिकाणी हा स्वाइन फ्लू वॉर्ड बांधून तयार झाला आहे, ती जागाच चुकीची निवडण्यात आली  आहे. स्वाइन फ्लूबाधितांवर उपचारादरम्यान निदानासाठी रुग्णाला लांब हलवता येत नाही.

परंतु, हा वॉर्ड मेडिकलच्या सोनोग्राफी, रक्ततपासणी तसेच इतरही चाचण्यांच्या विभागांपासून बराच लांब आहे. रस्ता ओलांडून या वॉर्डात जावे लागते. यामुळे पॅथॉलॉजीची सोय वॉर्डात नाही. स्वाइन  फ्लू बाधितांना ठिकाणापासून जवळच उपचार केंद्र असावे, असा दंडक आहे. मात्र, वॉर्ड  बांधताना नियोजन न केल्याने विभागाकडूनच हरताळ फासला गेला.

मेडिकलचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्या काळात हा साडेसहा कोटींचा स्वतंत्र वॉर्डाचा प्रस्ताव होता. परंतु, पुढे निधीमध्ये कपात करून १ कोटी ९१ लाख रुपयात वॉर्ड बांधण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार  तळमजल्याचा ‘स्वाइन फ्लू’ वॉर्ड तयार केला गेला.

‘स्वाइन फ्लू’वॉर्डाची इमारत शोभेची वास्तू  
तीस खाटांची क्षमता असलेल्या या वॉर्डासाठी जिल्हा विकास नियोजन व विकास विभागाकडून मिळालेल्या निधीतून बांधकाम पूर्ण करण्यात आले. या वॉर्डासाठी लागणारी यंत्रसामग्री, उपकरणे, व्हेंटिलेटर्स, मनुष्यबळासह विजेच्या जोडणीसंदर्भात एकही प्रस्ताव मेडिसीन विभागाने अद्याप अधिष्ठातामार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला सादर केला नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून स्वाइन फ्लू वॉर्डाची इमारत शोभेची वास्तू म्हणून या परिसरात उभी आहे. या वॉर्डाचा कोणताही उपयोग सध्या होत नाही.  

स्वाइन फ्लूने तिघे दगावले
स्वाइन फ्लूचा हैदोस नागपुरात सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांत सात जण दगावल्यानंतर पुन्हा गुरुवार २१ सप्टेंबरला स्वाइन फ्लूने तिघे दगावले असल्याची नोंद आरोग्य विभागात झाली आहे. स्वाइन फ्लूचा विषाणू आता विदर्भात रुळला असून नागपूर आणि अकोला विभागात स्वाइन फ्लूने मृत्यूचे शतक गाठले आहे. 

स्वाइन फ्लू बाधितांचे मृत्युसत्रात प्रचंड वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसांत विविध रुग्णालयांत दहा जण दगावले आहेत. विशेष असे की, पुढे नवरात्रोत्सव आणि दसरा आहे. या उत्सवांवर स्वाइन फ्लूचे सावट पसरले आहे. मेयो, मेडिकल आणि खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूचे मृत्यू होत आहेत. स्वाइन फ्लूच्या बाधेने सहा वर्षांची नारी परिसरातील चिमुकली दगावली आहे. सोबतच शिवनी येथील ४३ वर्षीय आणि ५५ वर्षीय व्यक्तींचा समावेश मृतांमध्ये आहे. नागपूर विभागात स्वाइन फ्लूने दगावलेल्या व्यक्तींची संख्या ७३ वर पोहोचली आहे. अकोला विभागात स्वाइन फ्लू बाधित मृत्यूंची संख्या ३० वर पोहोचली आहे. विदर्भात स्वाइन फ्लूचे शतक पूर्ण झाले असून स्वाइन फ्लू बाधितांचा आकडा साडेपाचशेवर पोहोचला आहे. स्वाइन फ्लूने नागपूर शहरात होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ होत आहे. ३३ मृत्यू शहरातील असताना आरोग्ययंत्रणा अद्याप जनजागरणात अडकली आहे.

Web Title: nagpur vidarbha news new swine flu ward not use