मेट्रोविरुद्ध सारेच राजकीय पक्ष एकत्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - रास्ता रोको आंदोलनात बोलताना नगरसेवक दुनेश्‍वर पेठे, शेजारी नगरसेवक बंटी शेळके व नागरिक.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - रास्ता रोको आंदोलनात बोलताना नगरसेवक दुनेश्‍वर पेठे, शेजारी नगरसेवक बंटी शेळके व नागरिक.

नागपूर - प्रकल्पाची कामे करताना नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत काँग्रेस, राष्ट्रवादी व सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी सोमवारी सेंट्रल एव्हेन्यूवरील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन केले. मेट्रो रेल्वे अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. 

रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मेट्रो रेल्वेच्या कामातील लोखंडी गर्डर पडल्याने  अमी जय जोशी या गंभीर जखमी झाल्या. त्यामुळे मेट्रो रेल्वेचे कंत्राटदार नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत नसल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दुनेश्‍वर पेठे, काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके व सत्ताधारी भाजपचे नगरसेवक व माजी स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करीत संतापाला वाट मोकळी करून दिली.

नगरसेवक व नागरिकांच्या आंदोलनाची माहिती मिळताच मेट्रो रेल्वेचे अधिकारी पोहोचले. त्यांनी नगरसेवक व नागरिकांशी चर्चा केली. या वेळी मेट्रो रेल्वेचे कामे करताना नागरिकांना अपघात होऊ नये, जाळी लावणे, दहा दहा मीटरवर सुरक्षारक्षकांची नियुक्त करणे आदी मागण्या नगरसेवक पेठे, शेळके व बोरकर यांनी अधिकऱ्यांकडे केल्या. अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जाईल, असे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले. मात्र, सुरक्षेत त्रुटी आढळल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनात प्रकाश राऊत, अयाज भाई, गुलशन मुनियार, रवींद्र इटकेलवार, अक्षय घाटोळे, अंबरीश ढोरे, विज्जूभाई शेख, प्रकाश मेश्राम, पिंटू मेश्राम, गुलशन मिंचानी, दीपक सलुजिया, विलास मेश्राम, बंटी फाल्के, महेश बोकलियानी, मिथुन श्रीराम, मुकेश दुपारे, मंदा चंदनखेडे, सीमा वासनिक, आशा बोरकर, उर्मिला मेश्राम, पूजक मदने, हेमंत कातुरे, आशीष लोणारकर, सौरभ शेळके, स्वप्नील बावनकर, निखिल बालगोटे आदी सहभागी झाले. 

दोन अभियंते निलंबित, १२ लाखांचा दंड
रविवारी झालेल्या अपघातप्रकरणी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी चौकशीचे निर्देश दिले. प्रकल्प संचालक महेशकुमार व महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चौकशी समितीने घटनेचा अहवाल दिला. अहवालावरून दोन अभियंत्यांना निलंबित केले. प्रकल्पाचे काम करीत असलेली कंत्राटदार कंपनी आयटीडी सिमेंटेशनवर दहा लाखांचा, तर एजीआयईएस या सुरक्षा कंपनीवर दोन लाखांचा दंड ठोठावला. प्रत्येक कामावर लाल झेंड्यांसह सुरक्षारक्षक, बॅरिकेडजवळील माती हटविण्याचे निर्देशही बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com