पावसामुळे पिकांना नवसंजीवनी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

नागपूर - गेले अनेक दिवस गायब असलेल्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने संपूर्ण जिल्ह्यातील पिकांना नवसंजीवन दिले. खोळंबलेली धानरोवणी मार्गी लागली तर कशीबशी तग धरून असलेली पऱ्हाटी पावसामुळे टवटवीत झाल्याचे दृश्‍य पहावयास मिळत आहे. 

कन्हान क्षेत्रात १२५.४ मिमी पाऊस
टेकाडी - कन्हान शहर परिसरात शुक्रवारी सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री झालेल्या पावसानंतर शनिवारी सकाळपासून ऊन पडायला सुरुवात झाली. पावसाचा शेतातील पिकांवर चांगला असर झाला आहे. जलसाठे वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याची आवश्‍यकता होती.

नागपूर - गेले अनेक दिवस गायब असलेल्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने संपूर्ण जिल्ह्यातील पिकांना नवसंजीवन दिले. खोळंबलेली धानरोवणी मार्गी लागली तर कशीबशी तग धरून असलेली पऱ्हाटी पावसामुळे टवटवीत झाल्याचे दृश्‍य पहावयास मिळत आहे. 

कन्हान क्षेत्रात १२५.४ मिमी पाऊस
टेकाडी - कन्हान शहर परिसरात शुक्रवारी सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री झालेल्या पावसानंतर शनिवारी सकाळपासून ऊन पडायला सुरुवात झाली. पावसाचा शेतातील पिकांवर चांगला असर झाला आहे. जलसाठे वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याची आवश्‍यकता होती.

पावसामुळे बळीराजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारच्या पावसाची तहसील कार्यालयात नोंद घेण्यात आली. परिसरात १२५.४ मिमी (एकूण ६५९.९६), पारशिवनी ११७.३ मिमी (एकूण ६५९.५), आमडी ९८ मिमी (एकूण ४५२), नवेगाव खैरी ४५ मिमी (एकूण ५३५.९), असा एकंदरीत ९६.४२ मिमी (एकूण ५७७.५२) इतक्‍या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

रस्त्यावरील पूल खचला
साळवा - उसंत घेतलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला. पावसाने परिसरातील प्रलंबित धानरोवणीच्या कामाला वेग आला आहे. रात्री आलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. यामुळे परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला. त्यातच कुही-साळवा रोडवर कुहीनजीक बाभळीचे झाड उन्मळून रस्त्यावर कोसळले. पांडेगाव नजीक असलेल्या नाल्यावरील पुलाला प्रचंड भगदाड पडले व रस्ता खचून वाहून गेला. याआधी हा रस्ता खचला होता. त्यावर दुरुस्तीचे काम सुरू असताना रात्री पुन्हा रस्ता खचला व सर्व साहित्य वाहून गेले.

काटोल तालुक्‍यात कमी पाऊस
काटोल - मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी पडलेला पाऊस सगळ्यात कमी असून फळबागा, पिके, पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. काटोल तालुक्‍यात पावसाची परिस्थिती अशीच राहली तर भीषण पाणीटंचाई निर्माण होईल. आजपर्यंत काटोल तालुक्‍यामध्ये एकूण ३७३.६८ मिमी पर्जन्यमानाची नोंद केली आहे. ही पाच वर्षांमधील सर्वांत कमी पावसाची नोंद आहे. जून आणि जुलै २०१७ या महिन्यांतील सर्वांत जास्त पाऊस होता. काटोल विभागात दमदार पाऊस न झाल्याने बागायतदारांना आतापासूनच उन्हाळात बागा वाचवण्याची चिंता सतावत आहे. पावसाचा असाच लपंडाव सूर राहिला तर शेतीसाठीच नाही तर वापराकरिता व पिण्याकरिता पाण्याची कमतरता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही .

महालगाव-दिघोरी गावांचा संपर्क तुटला
कामठी - तालुक्‍यात दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात रस्ते, नाले, वस्त्या जलमग्न झाले. तालुक्‍यातील जनजीवन विस्कळीत झाले असून तालुक्‍यातील महालगाव-दिघोरी मार्गावरील नागनदीच्या पुलावरून पाणी गेल्याने दिघोरी (काळे)गावातील ग्रामस्थांना या पुलावरून रास्ता ओलंडणे अशक्‍य झाले. महालगाव-दिघोरी गावांचा संपर्क तुटल्याने तालुक्‍यातील ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागली. शुक्रवारी रात्री आठपासून सुरू झालेल्या संततधार पावसाची नोंद पाहिली असता कामठी तालुक्‍यातील कामठी सर्कलमध्ये १४२.६ मिमी, कोराडी सर्कलमध्ये ८२.६ मिमी, वडोदा सर्कलमध्ये ७२.६ मिमी, दिघोरी सर्कलमध्ये ८४.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. रात्री ८ वाजेपासून सतत ३ तास दमदार पावसाने शहरातील नाले तुडुंब भरले. कित्येकांच्या घरात पाणी शिरले असल्याने नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले होते. शेतपिकासाठी हा दमदार पाऊस काही प्रमाणात समाधानकारक ठरला. मात्र तालुक्‍यातील महालगाव, दिघोरी गावाचा संपर्क तुटल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली होती.

पूल गेला पाण्याखाली
गुमगाव - राज्यसभा सदस्य अजय संचेती यांनी दत्तक घेतलेल्या वागदरा गावाजवळ धानोली हे छोटेसे गाव. कित्येक दिवसांनंतर शुक्रवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे धानोली गावाकडून वाहणारी वेणा नदी दुथडी वाहू लागली. पहाटेच्या वेळेस तर नदीवर असलेल्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने पाण्यासोबत वाहून आलेल्या मोठमोठ्या लाकडांमुळे पुलावरील लोखंडी कठडे तुटले आणि पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही महिन्यांआधीच पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन पूल रहदारीस सुरू करण्यात आला, हे विशेष. अनेक दिवसांनंतर वेणामाय पाण्याने भरून आल्याने तरुण, तरुणी, वयस्क आणि बच्चेकंपनीने नदीकडे धाव घेतली. तिथे अनेकांनी ‘सेल्फी’ काढण्याची हौस भागवून घेतली. 

उकाड्यापासून जनतेला दिलासा
हिंगणा - मॉन्सूनला प्रारंभ होऊन अडीच महिन्यांचा कालावधी झाला. अद्याप समाधानकारक पाऊस पडला नव्हता. मात्र, तब्बल १५ दिवसांच्या अंतराने तालुक्‍यात दमदार पावसाने शुक्रवारी रात्री हजेरी लावली. २७२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून सरासरी ४५.३६ मिमी आहे. पावसाच्या आगमनाने उकाड्यापासून जनतेला दिलासा मिळाला.

आता खरा खरीप हंगामाला प्रारंभ झाला. पाऊस चांगला पडणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. या भाकितावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. तालुक्‍यात पावसाची सरासरी ७५० मिमी आहे. यावर्षी जून, जुलै, ऑगस्ट महिना अर्धा लोटला असताना आतापर्यंत ४६५.६१ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. 

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने पाठ फिरविली होती. यामुळे शेतकरी चिंतातुर झाला होता. तलाव, विहिरी, नद्या, नाले ताहनलेलेच होते. अडीच महिने पावसाळा लोटूनही मुबलक पाणीसाठा उपलब्ध स्रोतामध्ये गोळा झाला नाही. यामुळे प्रशासनही चिंतेत पडले आहे. 

थोडा समाधानकारक
कोदामेंढी - मौदा तालुक्‍यात सर्वाधिक धान पिकाची लागवड केल्या जाते. यंदाच्या मोसमात पावसाने जणू डोळे वटारल्यामुळे भयावह स्थिती होती. शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहात होता. यंदा कोरडा दुष्काळ तर जाणवेल नाही ना? असा सवाल सर्वसामान्यांच्या तोंडून निघत होता. महिन्याभराच्या उसंतीनंतर शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. धो धो बरसलेल्या पावसामुळे कोरडे पडलेली नदी, नाले, दुथडी वाहू लागले.

शेतकऱ्यांच्या खोळंबलेल्या धान रोवणीला आता जोम आला, हे मात्र नक्की. या पावसामुळे शेतपिकावरील रोगराईला आळा बसेल, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिसरातील जवळपास साठ टक्के धान रोवणी बाकी होती. दुष्काळ व दुष्काळसदृश परिस्थितीच्या जंजाळात अडकलेल्या शेतकऱ्याला थोडा दिलासा मिळाला. दुष्काळ घोषित करण्याची वेळ आली असताना निसर्गाची कृपा मात्र झाली.

जलाशयाची पातळी वाढली
धामणा (लिंगा) - परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाने वेणा नदीला पूर येऊन जलाशयाची पातळी वाढली. हा पाऊस रात्रभर सुरू होता. पावसाने शेतकरी आनंदीत झाला. तीन दिवस मुसळधार पडण्याची शक्‍यता असल्याचे भाकीत मात्र खरे ठरले.

वाचकांच्या नजरेतून पाऊस...

वृंदावन कॉलनी - भरत नगर, अमरावती रोड, नागपूर येथे मध्यरात्रीच्या पावसाचे पाणी जमा झाले. अजून पाऊस वाढला असता तर तळमजल्यावरील घरात पाणी गेले असते. ड्रेनेज लाइन चोक झाल्याने पाणी घरात घुसत आहे. अमरावतीकडे जाणारा महामार्ग दिवसेंदिवस उंच होत आहे. त्यामुळे कॉलनीत पाणी घुसत आहे. शनिवारी दिवसभर या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक भाऊराव हेडाऊ यांनी दिली.

नरेंद्रनगर - छोट्या- मोठ्या पावसाने नरेंद्रनगर येथील रेल्वेच्या खालील पूल पूर्णपणे पाण्याने भरलेला असतो. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा.

नीलकमलनगर - मध्यरात्रीच्या पावसामुळे नरसाळा येथील कीर्तिधर सोसायटीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. रस्ते उंच आणि अंगण खाली झाल्याने पावसाचे पाणी थेट लोकांच्या दारातून घरात जात आहेत, असे उमाकांत बनसोड यांनी सांगितले.

पिपळाफाटा - येथील कलावतीनगर परिसरातील नाल्याला पूर आल्याने रात्री ११ ते १२ च्या दरम्यान नाल्याजवळील फ्लॅट स्किममध्ये पाणी घुसले. पार्किंगमधील वाहने पाण्याखाली आली, अशी माहिती अमोल धनुष्कर यांनी दिली.

ब्राह्मणी - शुक्रवारी रात्री ११ ते २ पर्यंत ब्राह्मणी- कळमेश्वर येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचा फटका नागरिकांना बसल्याची माहिती सूरज फुके यांनी दिली.

कामठी - तालुक्‍यातील गुमथळा येथील उपकेंद्रात दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे केम येथे पिण्याचे पाणी मिळणे कठिण झाले. गावातील नागरिकांची गैरसोय होत असल्याचे अरुण बाळबुधे यांनी सांगितले. 

केळवद - मागील एक महिन्यापासून केळवदसह परिसरात पावसाने हुलकावणी दिल्याने पिकांची वाढ खुटंली होती. त्यामुळे बळीराजा हताश झाला होता. अशातच मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने परत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी पिकांत या पावसामुळे चैतन्य निर्माण झाले आहे.

बाजारगाव परिसरात नदी-नाले तुडुंब
बाजारगाव - परिसरात शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. नदी-नाले तुडुंब भरले. जंगलातील लाकडाचा ओंडका पाण्याच्या प्रवाहाने नाल्यात आला. देवळी या गावात जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर येऊन अडकला. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला. पूर्ण पावसाळ्यात नदी-नाले भरण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असला, तरी गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या पावसामुळे बाजारगाव येथील नाईक तलाव हा पूर्ण कोरडा होता. त्यामुळे आता हा अर्धा भरला व नदी-नाल्याना चांगले पाणी आले. परिसरातील नागरिक व शेतकरी सुखावला आहे.

Web Title: nagpur vidarbha news rain for crop