मंजुळा शेट्ये प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी - विजया रहाटकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

नागपूर - भायखळा कारागृहातील मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज (ता. 11) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

नागपूर - भायखळा कारागृहातील मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज (ता. 11) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

काही दिवसांपूर्वी भायखळा महिला कारागृहात मंजुळा शेट्ये हिला कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी विवस्त्र करून मारहाण केल्याने तिचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले. याची दखल घेत राज्य महिला आयोगाने "सुमोटो' याचिका दाखल करून घेतली. कारागृह प्रशासनाला नोटीस बजावून अहवाल मागितला. त्यानंतर आयोगाच्या सदस्यांसह कारागृहाला भेट देऊन पाहणी केल्याचे रहाटकर यांनी सांगितले. तेथील जवळपास 300 महिला कैद्यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेट्ये हत्याप्रकरण गंभीर असून, यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. या प्रकरणाच्या चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत केली. यात माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, दृष्टी स्वयंसेवी संस्थेच्या अंजली देशपांडे यांचा समावेश आहे. या समितीची पहिली बैठक नुकतीच पार पडली. समितीने चौकशीला सुरवात केली आहे. समितीला या प्रकरणातील सर्व बारकावे तपासून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या निर्देश दिल्याचे रहाटकर यांनी सांगितले.

तक्रारीसाठी कारागृहात बोर्ड
भायखळा कारागृहातील हत्या प्रकरणानंतर कारागृहातील महिला कैद्यांमध्ये असुरक्षेततेचे वातावरण आहे. अशा प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आयोगाने गंभीर पावले उचलली आहेत. कारागृहातील महिला कैद्यांना त्यांच्या समस्या आयोगाकडे मांडता याव्यात, यासाठी तिथे तक्रारीसंबंधी फलक लावण्यात आले. या फलकांवर आयोगाच्या सदस्यांचे आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे मोबाईल आणि दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. शिवाय त्यांना कुठल्या सोयी-सुविधा मिळतात, याचा दर महिन्याला आढावा घेतला जाणार असल्याचे रहाटकर यांनी सांगितले.

Web Title: nagpur vidarbha news sit for manjula shetye case inquiry