करदात्यांच्या रात्री उशिरापर्यंत रांगा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

अडीचशे कोटींचे लक्ष्य गाठणार 
महापिालका आयुक्तांनी २०१७-१८ च्या सुधारित अंदाजपत्रकात मालमत्ता करातून अडीचशे कोटींचे लक्ष्य निर्धारित केले होते. देयके भरण्यासाठी सुज्ञ मालमत्ताधारकांनी रात्री उशिरापर्यंत रांगा लावल्या असल्याचे मेश्राम म्हणाले. शासनाच्या विविध विभागाकडून २ एप्रिलपर्यंत मालमत्ता कर अदा केला जातो. ही रक्कम अडीच कोटींची आहे. त्यामुळे यंदा मालमत्ता कराचे लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरणार, असा विश्‍वास मेश्राम यांनी व्यक्त केला.

नागपूर - आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शहरातील मालमत्ताधारकांनी कर भरण्यासाठी महापालिकेच्या दहाही झोनसह विविध करवसुली केंद्रांवर एकच गर्दी केली. आज दुपारी चार वाजेपर्यंत सात कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले असून उशिरा रात्रीपर्यंत करदात्यांच्या रांगा कायम होत्या. मालमत्ता कराने दोनशे कोटींचा टप्पा गाठला. 

सायबरटेक कंपनीने केलेल्या घोळामुळे केवळ दीड लाख मालमत्ताधारकांपर्यंतच देयके पोहोचली. त्यातही दुरुस्ती अपेक्षित आहे. चार लाख मालमत्ताधारकांना देयके मिळाली नाही. मात्र, महापालिकेने मालमत्ता कर मागील वर्षीप्रमाणेच भरण्याचे आवाहन केले होते. नव्या कर प्रणालीनुसार देयकांत दुरुस्तीनंतर फरकाची रक्कम वसूल करण्यात येईल, असेही कळविले होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी देयकांची प्रतीक्षा न करता झोन कार्यालयात मागील वर्षीप्रमाणे मालमत्ता कराचा भरणा केला. महापालिकेने नागरिकांसाठी झोन कार्यालयासह विविध ठिकाणी कर वसुली केंद्र उघडले होते. एवढेच नव्हे सुटीच्या दिवशीही कर वसुली केंद्र सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे २२ मार्चपर्यंत महापालिकेने १७७ कोटींचा कर वसूल केला. २३ मार्चपासून आज दुपारी चार वाजेपर्यंत अंदाजे ३० कोटी रुपयांवर वसूल झाल्याचे कर आकारणी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेने आज मालमत्ता कराचा दोनशे कोटींचा टप्पा ओलांडला.

Web Title: nagpur vidarbha news tax deposit municipal line